शिंदखेडा भूमी अभिलेख विभागाचा लाचखोर लिपिक जळगाव एसीबीच्या जाळ्यात


Bribery Clerk of Shindkheda Land Records Department in Jalgaon ACB’s net धुळे : जमीन मोजणीसाठी तडजोडीअंती 20 हजारांची लाच स्वीकारणार्‍या शिंदखेडा भूमी अभिलेख विभागातील लाचखोर छाननी लिपिक सुशांत शाम अहिरे (36, रा.राजेंद्र नगर, साक्री रोड, प्लॉट नंबर 23, धुळे) यास जळगाव एसीबीच्या पथकाने रविवार, 8 रोजी दुपारी धुळे शहरातील प्रांताधिकारी कार्यालयाच्या परीसरात रंगेहाथ अटक केली. विशेष म्हणजे सुटीच्या दिवशी आरोपीने तक्रारदाराकडून लाच स्वीकारताच त्यास पकडण्यात आले. जळगाव एसीबीचे पोलिस उपअधीक्षक शशीकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संजोग बच्छाव व सहकार्‍यांनी सापळा यशस्वी केला.

धुळ्यात जळगाव एसीबीचा सापळा यशस्वी
जळगावातील महाबळ भागातील तक्रारदाराची बेटावद, ता.शिंदखेडा येथे शेतजमीरन आहे. तक्रारदार यांनी जमीन मोजणीसाठी अर्ज केल्यानंतर चार गटाचे काम करून देण्यासाठी 40 हजारांची मागणी आरोपी छाननी लिपिक सुशांत अहिरे यांनी केल्यानंतर तक्रारदाराने त्यास सुरूवातीला 20 हजार रुपये दिले व उर्वरीत 20 हजारांची मागणी केल्यानंतर जळगाव एसीबीकडे तक्रार नोंदवल्यानंतर शनिवारी लाचेची पडताळणी करण्यात आली. धुळे शहरातील प्रांताधिकारी कार्यालय आवारातील भूमी अभिलेख कार्यालयाच्या परीसरात आरोपीने लाचेची रक्कम स्वीकारण्याची तयारी दर्शवल्यानंतर सापळा रचण्यात आला. आरोपीने लाच स्वीकारताच त्यास पथकाने अटक केली. रविवारी दुपारी दोन वाजता झालेल्या कारवाईनंतर लाचखोरांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे.


कॉपी करू नका.