भुसावळात भूकंपाचे हादरे : पालिकेचे 80 मालमत्ताधारकांना बजावल्या नोटीसा

24 तासांचा अल्टीमेटम : इमारत खाली न केल्यास पालिका स्वखर्चाने करणार कारवाई


Earthquake tremors in Bhusawal : Municipality issues notices to 80 Property Owners भुसावळ : शहरात शुक्रवारी सकाळी 10.35 वाजता तीन ते पाच सेकंद भूकंपाचे हादरे बसल्याने शहरासह परीसरात खळबळ उडाली होती. विशेष केंद्र भूकंपाचा केंद्रबिंदू हा भुसावळच असल्याचे स्पष्ट झाल्याने नागरीकांची काळजी अधिकच वाढली तर नाशिकच्या मेरी संस्थेने भूकंपाची तीव्रता 3.3 रीस्टर स्केल इतकी नोंदवली. भूकंपाच्या हादर्‍यानंतर पालिका प्रशासन अ‍ॅक्टीव्ह मोडवर आले असून जिल्हाधिकार्‍यांच्या सूचनेनंतर शहरातील विविध भागातील पडक्या इमारतीच्या मालकांना नोटीस बजावण्याचे काम सुरू करण्यात आले तर पालिकेच्या जीर्ण इमारतीबाहेर व्यवसाय करणार्‍या दुकान चालकांनाही नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. 24 तासांच्या आत इमारती खाली करण्याचे बजावण्यात आले असून अन्यथा पालिका स्वखर्चाने ही कारवाई करणार असल्याचे त्यात नमूद आहे.

या भागात आहेत धोकेदायक इमारतींसह घरे
शहरातील जुना सातारा, पांडववाडा, सुतारगल्ली, शिवाजी नगर, गरूड प्लॉट, म्युन्सीपल पार्क, कुलकर्णी प्लॉट, मांगीलाल बिल्डींग, गांधी चौक, बाजार गल्ली, राजू गल्लीसमोर, स्टेशन रोड, मरीमाता मंदिरासमोर, पाटीलमळा, रामदेवबाबा नगर, तळेले कॉलनी, पाटील नर्सरी, रजा टॉवर चौक, व्ही.एम.वॉर्ड, तुळजाभवानी मंदिर, जामनेर रोड, अष्टभूजा मंदिराजवळ, ब्राह्मण संघ आदी भागात भागात धोकेदायक इमारती व घरे आहेत. जवळपास दशकभरापूर्वीच या इमारती जमीनदोस्त होणे आवश्यक असताना तसे झालेले नाही मात्र धोका लक्षात घेऊन इमारतींमधील रहिवाशांनी इतरत्र स्थलांतर केले आहे. तर काही इमारतींमध्ये अद्यापही व्यावसायिक व भाडेकरूंचा रहिवास सुरू आहे.

24 तासांचा अल्टीमेटम
पालिकेने शहरातील 80 मालमत्ताधारकांना शनिवारी महाराषट्र नगरपरीषद, नगरपंचायती व औद्योगिक नागरी अधिनियम 1965 चे कलम 195 अन्वये नोटीसा बजावल्या आहेत. पडावू व जीर्ण इमारती/घरे रहदारीच्या रस्त्यावर असल्याने नोटीस मिळाल्यापासून 24 तासांच्या आत पाडाव्यात अन्यथा नगरपालिका स्वखर्चाने या इमारती पाडेल व खर्च संबधिताकडून वसुल करण्यात येईल, असे नोटीसीत नमूद करण्यात आले आहे.

धडक कारवाईअभावी पुढचे पाढे पंच्चावन्न
शहरातील विविध भागातील जीर्ण घरांसह इमारतींबाबत पावसाळा आल्यानंतही पालिकेकडून नोटीस बजावण्याचे सोपस्कार पार पडतात मात्र प्रत्यक्षात कुठलीही कारवाई होत नाही. अर्थात या मागे अनेक भाडेकरू व घर मालक यांच्यात वर्षानुवर्षे कोर्ट केसेस सुरू आहेत त्यामुळेदेखील याबाबतचा तोडगा निघत नसल्याने रस्त्यावरून येणार्‍या-जाणार्‍यांचे आयुष्य मात्र धोक्यात आले आहे. एखादी इमारत कोसळल्यास प्रसंगी जीवितहानी होण्याचा धोका असतानाी इमारत मालक मात्र गंभीर नसल्याचे दिसून येते किमान आतातरी हा प्रश्न सुटावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.


कॉपी करू नका.