भुसावळात महावीर जयंतीनिमित्त शोभायात्रा


भुसावळ : शहरात भगवान महावीर जयंतीनिमित्त जैन समाजबांधवांमध्ये मोठा उत्साह दिसून आला. मंगळवारी दिवसभर शहरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले तर सकाळी शहरातून विविध भागातून काढण्यात आलेल्या शोभायात्रेने शहरवासीयांचे लक्ष वेधले. सकल जैन समाज व भगवान स्वामी महावीर जन्म कल्याणक महोत्सव समितीतर्फे दुचाकी रॅलीही निघाली. मंगळवारी सकाळी 6 ते 6.45 वाजता भगवान महावीर याच्या प्रतिमेची पूजा, पंचामृत अभिषेक आठवडे बाजारातील जैन मंदिरात करण्यात आला. सकाळी 6.50 वाजता ध्वजारोहण प्राचीन जैन मंदीरात करण्यात आले. सकल जैन धर्मीयातर्फे श्री 1008 भगवान महावीर स्वामी याच्या जन्म कल्याणक महामहोत्सवाचे आयोजन केले होते.

शोभायात्रेने वेधले लक्ष
मंगळवारी सकाळी सात वाजता गांधी चौकातून दुचाकीला रॅलीला सुरूवात झाल्यानंतर शोभायात्राही काढण्यात आली. गांधी चौक, सराफ बाजार, मोठी मशीद चौक, अप्सरा चौक, डीस्को टॉवर, जवाहर डेअरी, ब्राम्हण संघ, जामनेर रोडने संतोषी माता हॉल येथे शोभायात्रा पोहोचल्यानंतर तिचा समारोप झाला. दुपारी 12 वाजता मंगलाचरण झाले. सायंकाळी 6.30 वाजता समता बहुमंडळातर्फे भगवान महावीर स्वामी पालना कार्यक्रम तर सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रम झाले. शोभायात्रेचे नेतृत्व अध्यक्ष अमोल वास्कर, उपाध्यक्ष कमलेश सांखला, उज्वल गोठी, कोषाध्यक्ष गजेद्र रूईकर, संजय चोरडीया अमीत चोरडीया आदींनी केले.

उत्कृष्ट कार्य करणार्‍यांचा गौरव
राजस्थान विप्र संघटन व आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आयोग व महिला कल्याण नियंत्रण समितीतर्फे शोभायात्रेदरम्यान उत्कृष्ट कार्य करणार्‍या जैन समाजातील कार्यकत्यांचा लक्ष्मी चौकात सन्मान करण्यात आला. जैन समाजाचे अध्यक्ष अमोल वास्कर, तेरापंथ सभा अध्यक्ष रवींद्र निमाणी, बावीस संप्रदाय अध्यक्ष सुगनंचद जयंतीलाल सुराणा, ज्येष्ठ नागरीक प्रचार समिती प्रमुख जे.बी.कोटेचा आदींचे स्वागत करण्यात आले. विनोद शर्मा, कैलास उपाध्याय, जयप्रकाश शुक्ला व घनश्याम मिश्रा आदींची उपस्थिती होती.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !