रावेर कृउबातील 18 जागांसाठी 153 उमेदवारी अर्ज दाखल
माघारीनंतर होणार चित्र स्पष्ट : उमेदवारी अर्जाच्या चोरीमुळे खळबळ
रावेर : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी सोमवारी उमेदवार अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी 109 उमेदवारांनी अर्ज दाखल केले.रावेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी चुरस वाढली बाजार समितीला यात्रेचे स्वरूप आले होते. विविध मतदारसंघातून एकूण 109 उमेदवार अर्ज दाखल करण्यात आले. दरम्यान, रावेर बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत अठरा जागांसाठी एकूण 153 एकूण उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. सेवा सहकारी संस्था मतदार सर्वसाधारण जागांसाठी 54, महिला राखीव 16, इतर मागासवर्गीय 10, विमुक्त जाती व भटक्या जाती 10, ग्रामपंचायत मतदार संघ सर्वसाधारण जागेसाठी 22, अनुसूचित जाती जमाती 13, आर्थिक दुर्बल घटक आठ, व्यापारी मतदार संघात 14, हमाल मापाडी मतदार संघ सहा जणांनी उमेदवार अर्ज दाखल केले.

5 एप्रिल रोजी छाननी
माजी सभापती नीळकंठ चौधरी, राजेंद्र चौधरी, डॉ.राजेंद्र पाटील, योगीराज पाटील, सोपान पाटील, प्रल्हाद पाटील, रमेश पाटील, दिलीप पाटील, गोपाळ नेमाडे, दुर्गादास पाटील यांच्यासह दिग्गज उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहे. 5 एप्रिल रोजी उमेदवारी अर्जांची छाननी होईल तर माघारीनंतर चित्र स्पष्ट होईल. त्यानंतर पॅनलद्वारे लढत होणार आहे.
अर्ज चोरीमुळे खळबळ
जिल्हा परीषदेच्या माजी अध्यक्षा रंजना पाटील यांचे पती तथा भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद पाटील यांचा उमेदवारी अर्जच चोरीला गेल्याने मोठी खळबळ उडाली होती. दुसरा अर्ज दिल्यानंतर त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केली मात्र पाटील यांचा अर्ज नेमका नेला कुणी? याविषयी दिवसभर येथे खलबते सुरू होती.
