27 वर्षांच्या आठवणींना उजाळा : वारूडला माजी विद्यार्थ्यांचा मेळावा

सेवानिवृत्त शिक्षकांसह कर्मचार्‍यांचा सहृदयी सन्मान : पाणावलेल्या डोळ्यांनी विद्यार्थ्यांनी घेतला निरोप


Reminisce 27 Years : Warud Alumni Gathering शिंदखेडा : आजपासून सुमारे 27 वर्षापूर्वी सारे विद्यार्थी वर्गात ज्ञानाजर्नासह खोड्या करीत होते. शिक्षकही त्यांना कधी रागावत होते तर कधी छडीचा मार देत शिस्तीचे धडे देते होते. भांडणे होत असलीतरी त्यात रागाचा, व्देषाचा लवलेश नव्हता. पाहता-पाहता दिवस कधी उलटले कळालेच नाही. दहावीच्या निरोप समारंभानंतर प्रत्येक जण आपापल्या करीअरच्या मार्गाने दूर झालेत मात्र आता तब्बल 27 वर्षांचा योग जुळून आल्यानंतर सारे विद्यार्थी त्याच वर्गात जमले. सत्तरी पार केलेल्या त्यावेळच्या शिक्षकांनी पुन्हा चाळीशी पार केलेल्या विद्यार्थ्यांना ज्ञानदान केले. निमित्त होते ते माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्याचे. वारूड, ता.शिंदखेडा येथील जवाहर नूतन विद्यालयात 1996 साली शिक्षण घेतलेल्या दहावीतील विद्यार्थ्यांचा स्नेहमिलन मेळावा नुकताच झाला. तब्बल 27 वर्षानंतर एकत्र आलेले मित्र-मैत्रिणी एकमेकांना पाहताच भारावून गेले.

शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त
वारूडच्या विद्यालयात एरव्ही शांतता असलीतरी आज मात्र विद्यार्थ्यांची रेलचेल होती. गणवेशात नसले तरी चाळीशीपार विद्यार्थी एकाच वर्गात शिस्तीत बसले होते. 1996 मध्ये इयत्ता दहावीच्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थी- विद्यार्थिनींचा एकत्रीत स्नेहमेळावा आयोजित नुकताच झाला. या कार्यक्रमात सेवानिवृत्त झालेल्या वर्ग शिक्षकांसह शिक्षकेतर कर्मचारी यांना बोलावून त्यांचा सहृदयी सन्मान करण्यात आला. त्यावेळच्या शिक्षकांप्रती एक कृतज्ञता विद्यार्थ्यांनी यावेळी व्यक्त केली. संस्थेचे पदाधिकारी भालेराव बेहेरे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी शिक्षकांमधून बी.एस.पाटील, गुजराथी, पाठक, भामरे, राणे, बापू पाटील आदी शिक्षकांनी मनोगत व्यक्त केले. प्रसंगी दिवंगत झालेल्या शिक्षक-शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी यांचे स्मरण करून त्यांना आदरांजली वाहण्यात आली.

माजी विद्यार्थ्यांचा उपक्रम प्रेरणादायी
सुमारे 27 वर्षांपूर्वी दहावीत शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांनी एकत्र येत घेतलेल्या मेळाव्याने त्याकाळी ज्ञानार्जन करणारे शिक्षकही भारावले. माजी विद्यार्थ्यांचा हा उपक्रम सेवानिवृत्त झालेल्या आम्हा सर्व शिक्षकांसाठी ऊर्जा देणारा आहे व आजही सत्तावीस वर्षांपूर्वीचे हे विद्यार्थी आमच्या समोर जणू शाळेच्या वर्गातच आहे, असा भास होत असल्याची भावना गुरूजनांनी व्यक्त करीत आमचं आयुष्यदेखील आरोग्य संपन्न होत असल्याचे यावेळी सांगितले.

जुन्या आठवणींमध्ये विद्यार्थी रमले
27 वर्षांपूर्वी दहावीच्या वर्गात एकमेकांची खोड्या काढणारे, वर्गात दंगा करणारे व परीक्षा येताच झपाटून अभ्यास करणारे वर्ग मित्र एकत्र आल्यानंतर अनेक मित्र-मैत्रिणींना गहिवरून आले. दहावी शिकताना त्यावेळी भरणार्‍या वर्गात प्रत्येकाने आपापला बेंच सांभाळत जुन्या आठवणींना प्रसंगी उजाळा दिला. प्रत्येकाने एकमेकांची ख्याली-खुशाली विचारत एकमेकांचा नंबरही यावेळी एक्सचेंज केला व पुन्हा लवकरच भेटू म्हणत पाणावलेल्या डोळ्यांनी एकमेकांचा निरोप घेतला तो गुरूजनांनी दिलेली संस्काराची शिदोरी सोबत घेवूनच !

मेळावा यशस्वीतेसाठी यांचे परीश्रम
मेळाव्याचे प्रास्ताविक निता बोरसे तर सूत्रसंचालन विनोद बाविस्कर तसेच आभार प्रदर्शन लीना महाजन यांनी मानले. मेळावा यशस्वीतेसाठी सुरेश महाजन, वसंत वाघ, दीपक बाविस्कर, मनोज बेहेरे, ब्रिजेश जोशी, नितीन, संभाजी बोरसे, संजय माळी, प्राजक्ता माळी, मनीषा सिसोदिया, चित्रा बोरसे, ज्योस्त्ना राणे, ज्योस्त्ना सोनवणे, संगीता दोरीक, रोहिणी, कल्पना पाटील, सुनील बोरसे, नितीन पाटील, दीपक बाविस्कर, दीपक महाजन, अधिकार भदाणे, महेंद्र बोरसे, प्रवीण बोरसे, प्रवीण बेहरे, अनिल, नितीन, जगदीश दोरीक आदींनी उपस्थिती होती.


कॉपी करू नका.