भुसावळातील दुहेरी हत्याकांड : आरोपीची न्यायालयीन कोठडीत रवानगी
Bhusawal double murder case : Accused sent to judicial custody भुसावळ : शहरातील वांजोळा रोडवरील बालाजी लॉनजवळील शकुन इस्टेटमध्ये पत्नी आवडत नसल्याच्या कौटुंबिक वादातून रेल्वे कर्मचार्याने पत्नीसह आईची मंगळवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास निर्घृण हत्या केली होती. खुनानंतर आरोपीला बाजारपेठ पोलिसांनी घरातूनच अटक केली होती. बुधवारी दुपारी भुसावळ सत्र न्यायालयात आरोपीला तपासाधिकारी राहुल गायकवाड यांनी हजर करीत पोलीस कोठडीचा हक्क राखून न्यायालयीन कोठडी घेतली. दरम्यान, आरोपीने स्वतःच दुहेरी हत्याकांडाची कबुली दिल्याने न्यायाधीशांसमोर त्याचा कलम 164 नुसार जवाब नोंदवण्यात येईल, असे पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी सांगितले.
दुहेरी हत्याकांडाने शहर हादरले
रेल्वेच्या सीअॅण्डडब्ल्यू विभागातील कर्मचारी तथा आरोपी हेमंत श्रवणकुमार भूषण (33, भुसावळ) याने मनाविरुद्ध लग्न झाल्याच्या रागातून पत्नी आराध्या हेमंत भूषण (23) व आई सुशीलादेवी भूषण (63) यांचा डोक्यात लोखंडी तवा तसेच रेल्वेत वापरण्यात येणार्या ब्रेक कीद्वारे निर्घृण खून केला होता. या हल्ल्यात आरोपीचा शालक ऋषभ सुरेंद्रकुमार साहू (35) जखमी झाला असलातरी घराबाहेर पळाल्याने बचावला. त्यानेच बाजारपेठ पोलिसांना हत्याकांडाची माहिती दिल्यानंतर दुहेरी हत्याकांड उघडकीस आले होता. बाजारपेठ पोलिसांनी धाव घेत आरोपीला अटक केल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी हलवल्यानंतर बुधवारी मयत आराध्याचा मृतदेह तिच्या भावासह नातेवाईकांचा ताब्यात देण्यात आला तर मृत सुशीलादेवी यांचा मृतदेह घेण्यासाठी दोन दिवसांनी नातेवाईक येणार असल्याने तो पर्यंत मृतदेह प्रीझर्व्ह ठेवण्यात येणार आहे.
