अन्न व पुरवठा विभागाची मोठी कारवाई : मुक्ताईनगरात 18 लाखांचा गुटखा जप्त

सहा संशयितांविरोधात गुन्हा : कारवाईने गुटखा तस्करांच्या गोटात खळबळ


Major action of Food and Supplies Department: Gutkha worth 18 lakhs seized in Muktainagar मुक्ताईनगर : गुटखा वाहतुकीचे केंद्रबिंदू असलेल्या मुक्ताईनगरात अन्न व औषध प्रशासन विभागाने गोपनीय माहितीच्या आधारे एका वाहनातून तब्बल 18 लाखांचा गुटखा जप्त केल्याने गुटखा तस्करांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे. सातत्याने गुटख्यावर कारवाई होत असतानाही तस्करी थांबत नसल्याने पोलीस यंत्रणेने ही बाब गांभीर्याने घेण्याची अपेक्षा आहे.

गोपनीय माहितीवरून कारवाई
बर्‍हाणपूरहुन छत्रपती संभाजीनगरकडे अवैधरीत्या पानमसाल्याची माहिती मिळाल्यानंतर अन्न व औषध प्रशासन अधिकारी रामचंद्र मारोतराव भरकड यांनी सहकार्‍यांसह मुक्ताईनगर-मलकापूर रोडवरील पिंप्री अकराऊत गावाजवळ रविवारी पहाटे सहा वाजता सापळा रचला. हॉटेल ओम साईजवळ महिंद्रा बोलेरो पिकअप (क्र.एम.एच.20 जी.सी.2967) आल्यानंतर तिची तपासणी केल्यानंतर त्यात गुटख्याची वाहतूक होत असल्याचे स्पष्ट झाल्याने वाहन पोलीस ठाण्यात आणण्यात आले. वाहनातून 11 लाख 13 हजार 600 रुपये किंमतीची राजनिवास पानमसाला, दोन लाख 40 हजारांचा जाफरानी जर्दा व साडेचार लाख रुपये किंमतीचे वाहन असा एकूण 18 लाख तीन हजार 500 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

सहा संशयितांविरोधात गुन्हा
या प्रकरणी अन्न व औषध प्रशासन अधिकारी रामचंद्र मारोतराव भरकड यांच्या फिर्यादीवरून आरोपी तथा वाहन चालक सचिन भीमराव कोलते (33), क्लिनर सुभाष रंगनाथ कनसे (45, दोन्ही रा.दीपक लॉनसमोर हर्सुल सावंगी, छत्रपती संभाजीनगर) यांना अटक करण्यात आली तर त्यांच्यासह वाहन मालक गजानन बाबासाहेब लेंभे (हर्सल सांगवी), विजय बाबासाहेब लेंभे (हर्सल सांगवी), जावेद भाई व सोहेल हबीब (पूर्ण नाव, गाव माहित नाही) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

गुटख्याचा प्रवास थांबणार कधी?
यापूर्वी आमदार एकनाथराव खडसे व नंतर गत आठवड्यात आमदार चंद्रकांत पाटील यांनी परीवर्तन चौकात गुटखा वाहतूक करणारे वाहन पकडून दिले. लोकप्रतिनिधींना गुटखा पकडण्याची वेळ येत असल्यास यंत्रणा करते काय? असा प्रश्न नागरीक उपस्थित करीत आहेत. यंत्रणेच्या छुप्या आशीर्वादाने सुरू असलेला गुटखा वाहतुकीचा प्रवास थांबणार कधी? असा प्रश्न नागरीक उपस्थित करीत आहेत.


कॉपी करू नका.