बोरखेडा बु.॥ हत्याकांड : चार साक्षीदारांची सरतपासणी


Borkheda   भुसावळ : रावेर तालुक्यातील बोरखेडा बु.॥ येथील हत्याकांडाच्या नियमित सुनावणीला भुसावळ सत्र न्यायालयात सोमवार, 29 मे पासून सुरूवात झाली आहे. पहिल्या दिवशी तीन साक्षीदारांची सरतपासणी करण्यात आल्यानंतर दुसर्‍या दिवशी मंगळवारी पुन्हा चार साक्षीदारांची सरतपासणी विशेष सरकारी वकील अ‍ॅड.उज्वल निकम यांनी केली. न्या.आर.एम.जाधव यांच्या न्यायासनासमोर खटल्याचे कामकाज झाले. राज्यात गाजलेल्या चौघा भावंडांच्या हत्याकांड प्रकरणी गुन्हा घडल्यापासून महेंद्र सीताराम बारेला (रावेर तालुका) हा कारागृहातच आहे.

दुसर्‍या दिवशीही चार साक्षीदारांची तपासणी
15 ऑक्टोंबर 2020 रोजी रावेर तालुक्यातील बोरखेडा शिवारातील एका शेतातील झोपडीत अल्पवयीन तरुणीवर अत्याचार होत असताना भावंडांना जाग आल्याने चौघा भावंडांची कुर्‍हाडीचे वार करीत हत्या करण्यात आली होती. रावेर पोलिसांनी अत्यंत बारकाईने या गुन्ह्याचा तपास करीत आरोपी निष्पन्न केल्यानंतर अद्यापही तो कारागृहातच आहे. सोमवारी विशेष सरकारी वकील अ‍ॅड.उज्वल निकम यांनी सोमवारी दुपारी या हत्याकांडातील प्रमुख फिर्यादी, घटनास्थळाचे पंच, सर्कल अधिकारी या प्रमुख मुख्य तीन साक्षीदारांची सरतपासणी घेतल्यानंतर मंगळवारी पुन्हा या खटल्यातील तलाठी, मृतांचे कपडे जप्त करणार्‍या पंचासह संशयिताला बोरखेडा रस्त्यावरून जाताना पाहणार्‍या साक्षीदारांची सरतपासणी करण्यात आली. सरकारतर्फे विशेष सरकारी वकील अ‍ॅड.उज्वल निकम तर आरोपीतर्फे अ‍ॅड.सत्यनारायण पाल यांनी काम पाहिले.

19 जून रोजी पुन्हा सुनावणी
हत्याकांड प्रकरणी 19 जून 2023 रोजी सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे. यावेळी डीएनए अहवाल घेतलेले तसेच चौघा भावंडांच्या मृतदेहाचे पी.एम.केलेले वैद्यकीय अधिकारी, गुन्ह्याचे तत्कालीन तपासाधिकारी व निरीक्षक रामदास वाकोडे, सहाय्यक पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांची साक्ष नोंदवली जाणार आहे.


कॉपी करू नका.