भुसावळातील शिवसेनेचा ढाण्या वाघ स्व.राजेंद्र दायमा

राजेंद्र दायमा यांचा एक आवाज आणि भुसावळ बंद


Rajendra Dayma, the tiger of ShivSena in Bhusawal भुसावळ : तो काळ होता 1985-19090 पासूनचा. या काळात ग्रामपंचायतीपासून पंचायत समिती, जिल्हा परीषद, आमदार, खासदार, राज्य सरकार व केंद्र सरकार या सर्व ठिकाणी बोलबाला होता तो केवळ आणि केवळ काँग्रेस पक्षाचा. सर्वत्र काँग्रेस असल्याने अन्य कुठल्याही पक्षाला काडीचीही किंमत नव्हती. भारतीय जनता पार्टी नवीनच उदयास येऊ पाहत होती. भाजपमध्ये त्याकाळी स्व.शांतीलाल सुराणा, स्व.बन्सीलालजी बियाणी मामा, स्व.बाकीलालजी रणधीर असे तीन भाजपाचे लाल म्हणून हळूहळू प्रसिद्धीस येत होते. याच काळात जळगाव जिल्ह्यातील शिवसेनेची सर्वात पहिली शाखा भुसावळ येथील विठ्ठल मंदिर वॉर्डात उघडण्यात आली. शाखाप्रमुख होते स्व.सुभाष बागुल. शाखेचे उद्घाटक होते स्व.गणेश जी राणा आणि समोर बसले होते अ‍ॅड.जगदीश कापडे, स्व.केशवराव पाटील, स्व.राजेंद्र दायमा, सुभाष पाटील. आधी सायंकाळी शिवाजी महाराजांचे पोवाडे आणि तुकाराम छत्रपतींचा जयघोष करीत बाळासाहेब ठाकरेंचा जयघोष करीत शिवसेनेची मुहूर्तमेढ भुसावळ शहरात रोवली गेली.

सर्वांचीच कारकिर्द अविस्मरणीय
कालांतराने शहराध्यक्ष म्हणून केशवराव पाटील, सुभाष बागुल, राजेंद्र दायमा, अ‍ॅड.जगदीश काकडे, हरीष फालक अशा अनेकांनी हे पद भूषविले. त्यात सर्वांचीच कारकीर्द ही मोठी अविस्मरणीय ठरली कारण त्या काळात हातात भगवा घेणे व घराबाहेर पडणे म्हणजे बाजारपेठ पोलीस स्टेशनमध्ये किंवा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होणे हे ठरलेले. अशा अनेक केसेस अंगावर घेत भुसावळची शिवसेना संपूर्ण भुसावळ शहरात व तालुक्यात घराघरात पोहोचवली ती कापडे आणि दायमा या जोडीने ! यांच्या कामाचा उरक आणि झपाटा पाहता हिंदूहृदयसम्राट स्व.बाळासाहेब ठाकरे यांनी राजेंद्र दायमा यांना जळगाव जिल्हा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख हे पद दिले. महाराष्ट्रात सर्वाधिक शिवसेना जिल्हाप्रमुख पद भूषविणारे दायमा आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या अत्यंत निकटवर्तीय व कडवट असे शिवसैनिक होते.

भुसावळच्या ऐतिहासीक सभेत बदलली उमेदवारी
1990 साली सर्वत्र शिवसेनेचा झंजावात असताना राजेंद्र दायमा यांना भुसावळ विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेची उमेदवारी जाहीर झाल्याचे ‘दैनिक सामना’मधून प्रसिद्ध झाले आणि शिवसैनिकांमध्ये जिल्हाभर आनंदाची लाट पसरली. सर्व शिवसैनिक झपाटून कामाला लागले. बाळासाहेबांचा शब्द म्हणजे आमदार होणे निश्चित मानले जायचे. याच धकाधकीत बाळासाहेब ठाकरे यांचा भुसावळ दौरा निश्चित झाला. त्या दिवशी सकाळी साडे अकराच्या सुमारास बाळासाहेब ठाकरे सुभाष देसाई, दत्ताजी नलावडे, सुधीर जोशी आणि सूर्यकांत महाडिक आदी पदाधिकारी भुसावळ शहरात दाखल झाले. स्थळ होते मनोज बियाणी यांचे निवासस्थान. बाळासाहेब ठाकरे यांचे अत्यंत राजेशाही थाटात प्रचंड पोलिसांच्या गराड्यात स्वागत करण्यात आले. यावेळी प्रोफेसर कॉलनीत मुंगीलाही शिरता येणार नाही इतक्या प्रचंड संख्येने शिवसैनिक हजर होते. साहेब आले, निवडक लोकांची चर्चा झाली. दुपारचे जेवण आटोपून थोडी वामकुक्षी झाल्यानंतर सायंकाळी ठीक सव्वा सात वाजता तत्कालीन द.शि.विद्यालयाच्या भव्य अशा प्रांगणावर साहेबांचे आगमन झाल. यावेळी केवळ जळगाव जिल्हा नव्हे तर खान्देशातील शिवसैनिक सभेला उपस्थित होते. ऐतिहासिक अशा या उत्तर महाराष्ट्रातील सभेला बाळासाहेब काय बोलतील ? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष होते. व्यासपीठावर बसलेले तत्कालीन जिल्हा परीषद सदस्य दिलीप आत्माराम भोळे यांना व जिल्हाप्रमुख असलेले राजेंद्र देवीलाल दायमा या दोघांना बाळासाहेबांनी व्यासपीठाच्या मधोमध उभे करून भुसावळ विधानसभेचे आपले उमेदवार दिलीप भोळे हे असतील असे जाहीर केले. त्याच क्षणी राजेंद्र दायमा हे दिलीप मोकळे यांना निवडून आणतील, असा शब्दही त्यांनी सोडवून घेतला. दायमा यांनी त्याच क्षणी बाळासाहेब ठाकरे यांचे चरण स्पर्श करीत शब्द दिला ‘साहेब’ आपला शब्द माझ्यासाठी प्रमाण आहे. आपण सांगाल तेच तोरण आणि आपण आदेश द्याल तेच धोरण. दिलीप माझा लहान भाऊ आहे, तो आपल्या आशीर्वादाने याच क्षणी आमदार झाला आहे, असे सांगताच प्रचंड टाळ्यांच्या कडकडाटात बाळासाहेब ठाकरे यांनी भरभरून आशीर्वाद दिले.

दायमाजींनी स्वतःच्या बुलेटवर सुरू केला प्रचाराचा झंझावात
शब्दाचे प्रमाण मानणारे दायमाजी दुसर्‍या दिवशी सकाळी सात वाजता दिलीप भोळे यांना स्वतःच्या बुलेटवर बसून मतदारसंघात घेऊन निघाले आणि प्रचाराचा झंजावात सुरू झाला. तो काळ अत्यंत भारावलेला होता. सर्वत्र भगवा आणि भगवाच दिसत असे. बाळासाहेबांची सभा झाल्यानंतर विजय हा निश्चित मानला गेला जात असला तरी राजेंद्र दायमा यांनी निवडणुकीला हलक्यात न घेता प्रत्येक दिवस हा गाजवून सोडला. स्व.बाळासाहेब ठाकरे यांना दिलेला शब्द तंतोतंत खरा करून दाखविला व जळगाव जिल्ह्यातील शिवसेनेचा पहिला आमदार म्हणून दिलीप भोळे यांचे नाव इतिहासात कोरले गेले.

गुलाबरावांशी अत्यंत मैत्री घट्ट
राजेंद्र दायमा व आताचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची अत्यंत घट्ट मैत्री. दायमा यांचा 15 ऑगस्ट रोजी वाढदिवस असल्यानंतर गुलाबराव भुसावळात आले नाही, असे कधीही झाले नाही. दायमांच्या वाढदिवसाला ते आवर्जून हजेरी लावत असत. दोघांच्या घट्ट मैत्रीची आजही कट्टर शिवसैनिक आवर्जून आठवण काढतात.

बलिदान, समर्पण व पक्षनिष्ठेचे उदाहरण म्हणजे राजेंद्र दायमा
त्याग बलिदान, समर्पण व पक्षनिष्ठा काय असते याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे स्व.राजेंद्र देवीलाल डायमा हे होय. मातोश्रीवर दायमा यांचे वजन असे होते की त्यांचे आगमन झाल्यावर भले भले पाठीमागे सरकून त्यांना ‘जय महाराष्ट्र’ घालत असे दायमा पुढे महाराष्ट्र राज्य प्रदूषण मंडळाच्या सदस्यपदी नियुक्त झाले होते. त्या काळात शिवसेनेच्या अनेक मंत्र्यांनी भुसावळात दौरे करून दायमा यांच्या कार्याचे कौतुक केल्याचे आजही आजच्या पिढीला आठवते. भुसावळ शहराचा नव्हे तर संपूर्ण जळगाव जिल्ह्याच्या ढाण्या वाघ म्हणून ज्यांची ओळख होती ज्यांच्या बुलेटच्या आवाजाने आपापसातील वाद शांत होत होते आणि काहीही झालेले नाही भाऊ असे शब्द कानी पडत होते, असे राजेंद्रजी दायमाजी आज आपल्यात नाहीत मात्र त्यांनी केलेल्या कार्याचा ठसा निश्चितच अजरामर राहिल व येणार्‍या पिढीला प्रेरणा देत राहील हेदेखील तितकेच खरे!


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !