वारकर्‍यांवर झालेला लाठीमार क्लेषदायक : अजित पवार


Lathi hit on Warkaris is painful : Ajit Pawar मुंबई : वारकर्‍यांवरील पोलीस लाठीमाराचा आणि लाठीमार करणार्‍या सरकारचा मी तीव्र शब्दात निषेध करतो, अशी भावना विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी व्यक्त केली आहे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलीं पालखीच्या आळंदीहून प्रस्थान सोहळ्यावेळी वारकरी बांधवांवर पोलिसांनी लाठीचार्ज केल्यानंतर त्यांनी सरकारवर टिकास्त्र सोडले. ते म्हणाले की, वारकर्‍यांवर पोलिसांकडून झालेला लाठीचार्ज क्लेषदायक आहे. महाराष्ट्राच्या संत, भक्तीपरंपरेचं वैभव असलेल्या पंढरपूर वारीच्या इतिहासात असं यापूर्वी घडलं नव्हतं. आजची घटना मनाला दु:ख देणारी आहे.

ही तर प्रशासनाची चूक
पवार म्हणाले की, महाराष्ट्राला पंढरपूरच्या आषाढीवारीची गौरवशाली परंपरा आहे. आषाढी वारी आणि आळंदीहून निघणारी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची पालखी हे आपल्या महाराष्ट्राच्या अध्यात्म, भक्तीपरंपरेचं वैभव आहे. दरवर्षी वारीसाठी हजारो वारकरी आळंदीत येतात. वारी आणि प्रस्थान सोहळ्याचं योग्य नियोजनही केलं जातं. वारकरीही या नियोजनाला सहकार्य करत असतात. परंतु, यंदा कुठेतरी चूक घडलेली दिसत आहे. अशी घटना यापुढे घडू नये, यासाठी पूर्ण काळजी घेण्यात यावी, असेही ते म्हणाले.

लाठीचार्ज झालेला नाही : देवेंद्र फडणवीस
आळंदी येथे कोणताही लाठीचार्ज झालेला नाही, त्यामुळे न घडलेल्या घटनेचे राजकारण करू नका. आपल्यासाठी वारकर्‍यांची सुरक्षा सर्वाधिक महत्वाची आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात गेल्यावर्षी चेंगराचेंगरी होऊन काही महिला जखमी झाल्या होत्या, तशी स्थिती निर्माण होऊ नये, याला पोलिसांचे प्रथम प्राध्यान्य होते, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूर येथे सांगितले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !