सहा हजारांची लाच भोवली : भुसावळ तालुका पोलीस ठाण्याच्या लाचखोर हवालदाराला अखेर अटक
Bribe of 6,000 : The bribe-taking constable of Bhusawal taluka police station was finally arrested भुसावळ : शेतकर्यावर इलेक्ट्रीक पंप चोरीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी सहा हजारांची लाच मागून ती स्वीकारणार्या भुसावळ तालुका पोलीस ठाण्यातील हवालदार गणेश पोपट गव्हाळे (41, रा.होली प्लेस सोसायटी, जामनेर) यांना गुरुवारी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास मांडवा फाट्यानजीक पकडण्यात आल्यानंतर पोलीस वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली होती. रात्री उशिरा कायदेशीर प्रक्रिया झाल्यानंतर संशयित गव्हाळे यांच्याविरोधात भुसावळ तलुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

असे आहे लाच प्रकरण
मांडवादिगर येथील 35 वर्षीय शेतकर्याच्या तक्रारीनुसार, त्यांची मांडवादिगर, ता.भुसावळ येथे शेतजमीन आहे. या शेतीसाठी लागणारे पाणी हे त्यांनी शेजारच्या शेतकर्याच्या विहिरीतून घेण्यासाठी त्यांनी विहिरीत स्वतःच्या मालकीची पाणी ओढण्याची मोटार लावली आहे शिवय इतर दोन शेतकर्यांनीदेखील स्वतःच्या मालकीच्या दोन मोटारी लावल्या आहेत. या विहिरीतील मोटारींपैकी एक मोटर चोरीला गेल्यानंतर ती तक्रारदार असलेल्या शेतकर्यानेच चोरल्याचा आळ अन्य दोघा शेतकर्यांनी व्यक्त केला होता व भुसावळ तालुका पोलिसात संबंधित शेतकर्याविरोधात तक्रारही दाखल केली होती. तक्रारदार शेतकर्याविरोधात चोरीचा गुन्हा दाखल न करण्याच्या मोबदल्यात आरोपी हवालदार गव्हाळे यांनी स्वतःसाठी एक हजार व ज्यांची मोटार चोरीला गेली त्यांच्यासाठी पाच हजारांची लाच 21 रोजी जून मागितली होती. तक्रारदाराने तक्रार नोंदवल्यानंतर लाच पडताळणी करण्यात आली.
लाच स्वीकारताच केली अटक
गव्हाळे यांनी रात्री गस्त आटोपल्यानंतर गुरुवारी सकाळी तक्रारदार शेतकर्याला लाचेची रक्कम देण्यासाठी मांडवा फाट्यावर बोलावल्यानंतर दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने गव्हाळे यांना लाच स्वीकारताच अटक केली. रात्री उशिरा भुसावळ तालुका पोलिसात गव्हाळे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
यांनी केला सापळा यशस्वी
हा सापळा जळगाव एसीबीचे प्रभारी पोलीस उपअधीक्षक अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक एस.के.बच्छाव, पोलीस निरीक्षक एन.एन.जाधव, एएसआय दिनेशसिंग पाटील, नाईक ईश्वर धनगर, राकेश दुसाने, सुरेश पाटील, हवालदार सुनील पाटील रवींद्र घुगे, शैला धनगर, किशोर महाजन, सुनील वानखेडे, बाळु मराठे, प्रदीप पोळ, सचिन चाटे, अमोल सूर्यवंशी, प्रणेश ठाकुर आदींच्या पथकाने यशस्वी केला.