भुसावळ तालुका पोलिस ठाण्यातील लाच घेणार्‍या ‘त्या’ हवालदाराचा जामीन फेटाळला : कारागृहात रवानगी


Bhusawal taluka police station ‘that’ constable who took bribe rejected bail : sent to jail भुसावळ : शेतकर्‍यावर इलेक्ट्रीक पंप चोरीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी सहा हजारांची लाच मागून ती स्वीकारणार्‍या भुसावळ तालुका पोलीस ठाण्यातील हवालदार गणेश पोपट गव्हाळे (41, रा.होली प्लेस सोसायटी, जामनेर) यांना गुरुवारी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास मांडवा फाट्यानजीक पकडण्यात आले होते. रात्री उशिरा कायदेशीर प्रक्रिया झाल्यानंतर संशयित गव्हाळे यांच्याविरोधात भुसावळ तलुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर शुक्रवारी दुपारी त्यांना भुसावळ सत्र न्यायालयात हजर केले असता दोन्ही बाजूचा युक्तीवाद ऐकून न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली तर जामिनाचा अर्ज मात्र फेटाळण्यात आल्याची माहिती तपासाधिकारी पोलीस निरीक्षक संजोग बच्छाव यांनी दिली. दरम्यान, गव्हाळे यांची आता कारागृहात रवानगी करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

असे आहे लाच प्रकरण
मांडवादिगर येथील 35 वर्षीय शेतकर्‍याच्या तक्रारीनुसार, त्यांची मांडवादिगर, ता.भुसावळ येथे शेतजमीन आहे. या शेतीसाठी लागणारे पाणी हे त्यांनी शेजारच्या शेतकर्‍याच्या विहिरीतून घेण्यासाठी त्यांनी विहिरीत स्वतःच्या मालकीची पाणी ओढण्याची मोटार लावली आहे शिवय इतर दोन शेतकर्‍यांनीदेखील स्वतःच्या मालकीच्या दोन मोटारी लावल्या आहेत. या विहिरीतील मोटारींपैकी एक मोटर चोरीला गेल्यानंतर ती तक्रारदार असलेल्या शेतकर्‍यानेच चोरल्याचा आळ अन्य दोघा शेतकर्‍यांनी व्यक्त केला होता व भुसावळ तालुका पोलिसात संबंधित शेतकर्‍याविरोधात तक्रारही दाखल केली होती. तक्रारदार शेतकर्‍याविरोधात चोरीचा गुन्हा दाखल न करण्याच्या मोबदल्यात आरोपी हवालदार गव्हाळे यांनी स्वतःसाठी एक हजार व ज्यांची मोटार चोरीला गेली त्यांच्यासाठी पाच हजारांची लाच 21 रोजी जून मागितली होती. तक्रारदाराने तक्रार नोंदवल्यानंतर लाच पडताळणी करण्यात आली.


लाच स्वीकारताच केली अटक
गव्हाळे यांनी रात्र गस्त आटोपल्यानंतर गुरुवारी सकाळी तक्रारदार शेतकर्‍याला लाचेची रक्कम देण्यासाठी मांडवा फाट्यावर बोलावल्यानंतर दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने गव्हाळे यांना लाच स्वीकारताच अटक केली. रात्री उशिरा भुसावळ तालुका पोलिसात गव्हाळे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !