भालोद शिवारात विहिरीच्या खोदकामादरम्यान अपघात : वडोद्यातील मजुर जागीच ठार
Accident during Well Digging in Bhalod Shiwar : Laborer from Vadodah killed on the spot यावल : तालुक्यातील भालोद शेत-शिवारामध्ये शेत विहिरीचे खोदकाम करीत असतांना विहिरीतून मातीची टोपली विहिरीबाहेर काढतांना साखळी तुटून झालेल्या दुर्घटनेत 45 वर्षीय मजुर जागीच ठार झाला. ही घटना रविवारी दुपारी घडली. घटनेनंतर मजुराचा मृतदेह यावल ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला. अनिल रतीगीर गोसावी (45, वडोदा) असे मयताचे नाव आहे.
अशी घडली दुर्घटना
भालोद येथील नितीन चौधरी यांच्या शेतात रविवारी विहिर खोदण्याचे काम चार मजुरांकरवी सुरू होते. विहिर खोदल्यानंतर एका मोठ्या टोपलीत माती भरून ती साखळीव्दारे विहिरीच्या बाहेर ओढून काढली जात होती. दुपारी माती बाहेर फेकण्यासाठी टोपली वर नेत असतांना अचानक साखळी तुटली आणि मातीची टोपली थेट विहिरीत कोसळली व विहिरीत काम करत असलेल्या अनिल रतिगीर गोसावी (45) यांच्या पाठीवर पडली. यात त्यांना जबर दुखापत होवून त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर त्यांना तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. घटनेची माहिती मिळताच वढोदा येथील नागरीकांनी मोठी गर्दी केली. याबाबत फैजपूर पोलिसांना माहिती देण्यात आली. फैजपूर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

