साकळीनजीक गौण खनिज प्रतिबंधक पथकावर हल्ला : ट्रॅक्टरही पळवले ; त्रिकूटाविरोधात गुन्हा
Attack on Subordinate Mineral Prevention Team near Sakali: Tractor also ran away; A crime against the trio यावल : तालुक्यातील साकळी गावात मुस्लीम कब्रस्तानजवळ महसूल विभागाच्या अवैध गौण खनिज वाहतूक प्रतिबंधक गस्तीपथकाने पकडलेले ट्रॅक्टर पळवून नेल्याचा प्रकार सोमवारी सायंकाळी घडला. ट्रॅक्टर मालक, चालक यांनी शासकीय वाहनाकडे दगड भिरकावत महसुलच्या अधिकारी, कर्मचार्यांना थेट मारहाण केली. या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
पथकाच्या ताब्यातून ट्रॅक्टर पळवत हल्ला
अवैध गौण खनिज वाहतूक करणारे ट्रॅक्टर (क्रमांक एम.एच.19 सी. व्ही. 0578) हे डांभूर्णी गावाजवळ नाल्यामध्ये पकडण्यात आल्यानंतर पथक ते यावलला घेवून येत असताना साकळी गावाजवळ मुस्लिम कब्रस्तान जवळ मंडळ अधिकारी सचिन जगताप, तलाठी मधुराजे पाटील, कोतवाल विकास सोळुंके आदींना रस्त्यात अडवून ट्रॅक्टर मालक सुपडू रमेश सोळुंके, चालक आकाश अशोक कोळी, गोपाळ प्रल्हाद सोळुंके (कोळन्हावी) यांनी वाद घातला आणि पथकातील मंडळाधिकारी जगताप यांच्यावर हल्ला केला व त्यांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. यात मंडळाधिकारी यांच्या डाव्या हाताला दुखापत झाली तसेच त्यांच्या तावडीतील ट्रॅक्टर त्यांनी पळवून नेते. पथकाने पाठलाग करण्याचा प्रयत्न केला असता शासकीय वाहनास लाकडी दांड्याने मारून वाहनाच्या दिशेने दगड भिरकावले व शासकीय कामात अडथळा निर्माण केला. याबाबतची माहिती मिळतात तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांनी पोलीस ठाणे गाठले. मंडळाधिकारी सचिन जगताप यांच्या फिर्यादीवरून तीन जणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुनील मोरे करीत आहे.

