मुक्ताईनगरात अठरा लाखांचा गुटखा जप्त : चालकाला अटक
अन्न व औषध प्रशासनाच्या कारवाईने गुटखा तस्करांमध्ये खळबळ
Gutkha worth eighteen lakhs seized in Muktainagar: Driver arrested मुक्ताईनगर : राज्यात प्रतिबंधीत असलेल्या गुटख्याची मुक्ताईनगर तालुक्यातून मोठ्या प्रमाणावर अवैध वाहतूक होत असतानाच अन्न व औषध प्रशासनाने गोपनीय माहितीच्या आधारे कर्कि चेकपोस्ट जवळ एका जीपमधून तब्बल 18 लाख 50 हजारांचा गुटखा जप्त केल्याने गुटखा तस्कर हादरले आहेत. या प्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून बोलेरो चालकाला अटक करण्यात आली.
गोपनीय माहितीवरून कारवाई
अन्न व औषध प्रशासनाला मुक्ताईनगर-बर्हाणपूर रस्त्यावरील कर्की चेकपोस्ट जवळ एक महिंद्रा पिकअप वाहन एम.एच.19 बी.एम.2384 या वाहनातून गुटख्याची तस्करी होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पथकाने वाहन ताब्यात घेत तपासणी केल्यानंतर 16 लाख 33 हजार 632 रुपये किंमतीचा पान मसाला तसेच एक लाख 92 हजार 192 रुपये किंमतीची सुगंधी तंबाखू व चार लाख रुपये किंमतीचे महेंदा पिकअप वाहन असा एकूण 22 लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अन्न औषध प्रशासन अधिकारी अविनाश रजेसिंग दाभाडे यांच्या फिर्यादीवरून बोलेरो चालक तथा आरोपी दिनेशकुमार आशिक बुदराणी (अहमदपूर, बिहार) सह गुटखा विक्रेते आशिक बुजराणी व सुशील गेही (दोन्ही रा.बर्हाणपूर) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, हा गुटखा मुक्ताईनगरातील एका व्यापार्याचा असल्याची माहिती आहे.

