भुसावळात ट्रकने दुचाकीला उडवले : वडिल जागीच ठार तर मुलगा गंभीर जखमीमी
A truck blew up a two-wheeler in Bhusawal: father died on the spot and son seriously injured
भुसावळ : लग्नाला हजेरी लावून घराकडे निघालेल्या पिता-पूत्रांच्या दुचाकीला दहा चाकी हायवा ट्रकने उडवल्याने झालेल्या भीषण अपघातात पित्याचा जागीच मृत्यू झाला तर मुलगा गंभीर जखमी झाला. हा अपघात वांजोळा रस्त्यावरील महामार्गावर बुधवारी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास घडला. अपघातानंतर हायवा ट्रक चालक पसार झाल्यानंतर संतप्त नागरीकांनी भुसावळचे आमदार संजय सावकारे यांच्या नेतृत्वात रास्ता रोको आंदोलन छेडल्याने रात्री उशिरापर्यंत वाहतूक ठप्प झाली होती. दरम्यान, या अपघातात प्रमोद वना झोपे (60) हे जागीच ठार झाले तर त्यांचा मुलगा धीरज प्रमोद झोपे (35, दोन्ही रा.दत्तनगर, भुसावळ) हा गंभीर जखमी झाला आहे.
घराकडे निघाल्यानंतर अपघात
वांजोळा रोड भागातील लग्न समारंभास हजेरी लावण्यासाठी झोपे पिता-पूत्र दुचाकीने गेल्यानंतर लग्न लावून घराकडे निघाल्यानंतर बुधवारी रात्री पावणेदहा वाजता त्यांच्या दुचाकीला भरधाव अज्ञात ट्रकने उडवल्याने प्रमोद झोपे यांचा मृत्यू झाला तर धीरज झोपे हा गंभीर जखमी झाला. भुसावळचे नगरसेवक पिंटू कोठारी यांनी धीरज यास अत्यवस्थ अवस्थेत शहरातील खाजगी रीदयम रुग्णालयात दाखल केले.

आमदारांचा नागरीकांसह रस्ता रोको
महामार्गावर झालेल्या भीषण अपघातानंतर याच भागात आलेले आमदार संजय सावकारे यांनी महामार्गावरच नागरीकांच्या उपस्थितीत रास्ता रोको केल्याने प्रशासनाची धावपळ उडाली. रात्री उशिरापर्यंत हे आंदोलन सुरूच असल्याने दूरवर वाहतूक ठप्प झाली होती.
पोलीस अधिकार्यांची धाव
अपघाताचे वृत्त कळताच डीवायएसपी कृष्णात पिंगळे, पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्यासह पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला. दरम्यान, या भागात अंडरपास सुरू करावा अशी मागणी या परिसरातील नागरिकांनी लावून धरली आहे.
