भुसावळात महामार्गावर प्रौढाला अपघाती मृत्यू : संशयित ट्रक चालकासह मालकास जळगावात पकडले
Accidental death of an adult on the highway in Bhusawal : Suspect truck driver along with owner arrested in Jalgaon भुसावळ : लग्नाला हजेरी लावून घराकडे निघालेल्या पिता-पूत्रांच्या दुचाकीला भरधाव ट्रकने उडवल्याने झालेल्या भीषण अपघातात पित्याचा जागीच मृत्यू झाला तर मुलगा गंभीर जखमी झाला. हा अपघात वांजोळा रस्त्यावरील महामार्गावर बुधवारी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास घडला. अपघातानंतर ट्रक चालक पसार झाल्यानंतर संतप्त नागरीकांनी भुसावळचे आमदार संजय सावकारे यांच्या नेतृत्वात अर्धा तास रास्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनामुळे रात्री उशिरापर्यंत वाहतूक ठप्प झाली होती. जिल्हाधिकार्यांनी या संदर्भात शुक्रवारी दुपारी दोन वाजता प्रांताधिकारी कार्यालयात बैठक घेत तोडगा काढण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. दरम्यान, या अपघातात प्रमोद वना झोपे (60) हे जागीच ठार झाले तर त्यांचा मुलगा धीरज प्रमोद झोपे (35, दोन्ही रा.दत्तनगर, भुसावळ) हा गंभीर जखमी झाला. पोलिसांनी ट्रक चालक व मालकास रात्री उशिरा जळगावातून ताब्यात घेतले.
घराकडे निघाल्यानंतर गाठले मृत्यूने
वांजोळा रोड भागातील लग्न समारंभास हजेरी लावण्यासाठी झोपे पिता-पूत्र दुचाकी (एम.एच.19 एक्स.8611) ने गेल्यानंतर लग्न लावून घराकडे निघाल्यानंतर बुधवारी रात्री पावणेदहा वाजता त्यांच्या दुचाकीला भरधाव ट्रक (एच.आर.63 डी.0303) ने जबर धडक दिल्यानंतर प्रमोद झोपे यांचा जागीच मृत्यू झाला तर धीरज झोपे हा तरुण गंभीर जखमी झाला. भुसावळचे नगरसेवक पिंटू कोठारी यांनी अन्य नागरीकांच्या मदतीने धीरज यास अत्यवस्थ अवस्थेत शहरातील खाजगी रीदयम रुग्णालयात दाखल केले.

आमदारांचा नागरीकांसह रस्ता रोको
महामार्गावर झालेल्या भीषण अपघातानंतर याच भागात लग्नासाठी आलेले आमदार संजय सावकारे यांनी महामार्गावरच नागरीकांच्या उपस्थितीत रास्ता रोको केल्याने पोलीस प्रशासनाची धावपळ उडाली. डीवायएसपी कृष्णात पिंगळे, पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्यासह पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला. दरम्यान, या भागात अपघात टाळण्यासाठी अंडरपास सुरू करावा, अशी मागणी परीसरातील नागरीकांनी केली. यावेळी आमदारांनी जिल्हाधिकार्यांशी संवाद साधल्यानंतर त्यांनी अंडरपासप्रश्नी शुक्रवारी दुपारी दोन वाजता भुसावळात बैठक घेण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलक शांत झाले.
ट्रक चालकासह मालक जळगावातून ताब्यातून
अपघात प्रकरणी भूषण प्रकाश झोपे (43, दत्तनगर, वांजोळा रोड, भुसावळ) यांच्या फिर्यादीनुसार, ट्रक चालकाविरोधात बाजारपेठ पोलिसात गुरुवारी मध्यरात्री अडीच वाजता गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, अपघातानंतर ट्रक चालक जळगावच्या दिशेने पसार झाल्यानंतर नशिराबाद पोलिसांना सूचित करण्यात आले. नशिराबादचे सहाय्यक निरीक्षक गणेश मोताळे यांच्या नेतृत्वात नाईक सुधीर विसपुते, चालक हवालदार महेंद्रसिंग पाटील, कॉन्स्टेबल बाळू पाटील आदींच्या पथकाने एमआयडीसी हद्दीतील अजिंठा चौफुलीजवळील ट्रान्सपोर्ट नगराजवळून संशयित ट्रक मालक सागर मोहर सुरेंद्रसिंग (22, हरीयाणा) व रामवीरसिंग सतवीरसिंग (33, सोनीपत, हरीयाणा) या दोघांना ट्रकसह ताब्यात घेत रात्री उशिरा बाजारपेठ पोलिसांच्या ताब्यात दिले. अपघाताला कारणीभूत असलेला ट्रक पोलीस उपअधीक्षक कार्यालयाच्या आवारात लावण्यात आला आहे.
