भुसावळात बकरी ईद उत्साहात : जगभरात शांती नांदण्यासह मुबलक पावसासाठी प्रार्थना
Bhusawal Bakri Eid in excitement : Prayers for abundant rains with peace around the world
भुसावळ : मुस्लीम बांधवांचा पवित्र सण ईद उल अजहा (बकरी ईद) गुरुवारी मोठ्या उत्साहात व शांततेत साजरा करण्यात आला. शहरातील खडका रोडवरील ईदगाह मैदानावर गुरुवारी सकाळी 8.30 वाजता मुस्लीम बांधवांनी सामूहिक नमाज अदा केली. हाफिज रेहान रजा यांनी सामूहिक नमाजचे पठण केले. यावेळी जगभरात शांतता नांदावी, मुबलक पाऊस पडावा, अशी प्रार्थना (दुवा) करण्यात आली. नमाज व दुवा पठणानंतर हिंदू-मुस्लीम बांधवांनी एकमेकांची गळाभेट घेत ईदच्या शुभेच्छा दिल्या. याशिवाय शहरातील मशिदीमध्येही ईदनिमित्त सामूहिक नमाज पठण करण्यात आले.
एकमेकांना दिल्या शुभेच्छा
गुरुवारी हिंदू बांधवांचा आषाढी सण व याच दिवशी बकरी ईद सणही आल्यानंतर हिंदू-मुस्लिम बांधवांनी एकमेकांना शुभेच्छा देत गळाभेट घेतली. यावेळी इदगाह मैदनावर पाच हजार पेक्षा जास्त मुस्लीम बांधवांची उपस्थिती होती. यावेळी डीवायएसपी कृष्णात पिंगळे, बाजारपेठ निरीक्षक राहुल गायकवाड यांच्यासह पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

साकेगावला ईद उत्साहात
साकेगाव येथे पावसामुळे ईदची नमाज ईदगाह मैदानाऐवजी मदिना मशीदीत सकाळी आठ वाजता पठण करण्यात आली. मौलाना फिरोज मणियार यांनी ईदचे महत्त्व विषद केले. देशामध्ये सुख समृद्धी शांतीसाठी प्रार्थना करण्यात आली. तालुका पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी यांनी समाजबांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या.
