भुसावळ शहरात रीक्षा चालू देण्यासाठीच मागितली चक्क खंडणी : एकाविरोधात गुन्हा
Extortion was demanded to run a rickshaw in Bhusawal city: a crime against one भुसावळ : भुसावळ शहरात रीक्षा चालवायची असेल तर दरमहा खंडणी द्यावीच लागेल, असे सांगत संशयिताने दरवाजावर बिअरच्या बाटल्या फोडल्याची घटना देना नगरातील गिरीजा बिल्डींगजवळ गुरुवारी पहाटे अडीच वाजता घडली. या प्रकरणी संशयित मंगेश अंबादास काळे (श्रीकृष्ण कॉलनी, भुसावळ) याच्याविरोधात बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
संशयिताविरोधात अखेर गुन्हा दाखल
प्रभाकर उखर्डू चौधरी (50, गिरीजा बिल्डींगजवळ, देना नगर, भुसावळ) हे व्यवसायाने रीक्षा चालक आहे. गुरुवारी पहाटे अडीच वाजता संशयित मंगेश अंबादास काळे याने घराच्या दरवाजा व छतावर बिअरच्या काचेच्या बाटल्या फोडून दरवाजाचे नुकसान केले तसेच घरात अनधिकृत प्रवेश करीत शर्टाची कॉलर पकडून भुसावळमध्ये रीक्षा चालवायची असल्यास दर महिन्याला चार हजार रुपये खंडणी द्यावी लागेल, अशी धमकी दिली तसेच पोलिसांकडे गेल्यास याद राख, असे म्हणत दोन हजार रुपये घेतले. प्रभाकर चौधरी यांनी बाजारपेठ पोलीस ठाणे गाठत तक्रार दिल्यावरून संशयिताविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार रवींद्र सपकाळे करीत आहेत.

