भुसावळ शहरातील सिंधी समाजाच्या मुक्तीधाम मंदिरात चोरी


Theft at Muktidham temple of Sindhi community in Bhusawal town भुसावळ : शहरात चोर्‍या-घरफोड्यांचे सत्र सुरू असतानाच चोरट्यांनी आता सिंधी समाजाच्या मुक्तीधाम मंदिरात चोरी केल्याने शहरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी बाजारपेठ पोलिसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

पहाटेच्या सुमारास चोरी उघडकीस
शहरातील महेश नगर भागा सिंधी समाजाचे मुक्तीधाम मंदिर आहे. या मंदिराची देखभाल व स्वच्छता ताराचंद अठवाणी करतात. मंगळवारी पहाटे अठवाणी हे मंदिराची स्वच्छता करण्यासाठी गेल्यानंतर त्यांना मंदिराचच्या स्टीलच्या दरवाजाचे कुलूप तुटलेले आढळल्यानंतर त्यांनी तातडीने परेलदास कुकरेजा यांना माहिती कळवली. त्यानंतर कुकरेजा यांच्यासह सेवादार नारायणदास रतनानी, उत्तम आहुजा, हेमराज आहुजा आदींनी धाव घेतली.

पाच हजार आठशे रुपयांचा मुद्देमाल लंपास
चोरट्यांनी तीन हजार रुपये किंमतीच्या तांब्याचा नाग, एक हजार सहाशे रुपये किंमतीचे पितळी त्रिशूल, पाचशे रुपये किंमतीचा पितळी डंबरू व सातशे रुपयांची रोकड असा एकूण पाच हजार आठशे रुपये किंमतीचा मुद्देमाल लांबवला. या प्रकरणी परेलदास चांदूमल कुकरेजा (71, सिंधी कॉलनी, भुसावळ) यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. चोरीची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे, पोलीस उपनिरीक्षक सांगळे व सहकार्‍यांनी भेट देत पाहणी केली. तपास हवालदार अन्वर शेख करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !