मध्य रेल्वेच्या चार कर्मचार्यांना महाव्यवस्थापक सुरक्षा पुरस्काराने सन्मान
भुसावळ : मध्य रेल्वेच्या नागपूर, भुसावळ, सोलापूर विभागातील कर्मचार्यांनी कर्तव्यावर असतांना दक्षता ठेवत रेल्वे गाडीचे होणार अपघात टाळल्याने या कर्मचार्यांना रेल्वेचे जीएम नरेश ललवाणी यांच्याहस्ते बुधवारी दुपारी महाव्यवस्थापक सुरक्षा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
अपघात टळला : रेल्वे प्रशासनाकडून सतर्कतेची दखल
मुंबई येथे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे आयोजित कार्यक्रमात मे-जून या दोन महिन्याच्या काळात कर्तव्य दक्षतेची दक्षता, अनुचित घटना रोखण्यात आणि रेल्वे संचालनात सुरक्षितता सुनिश्चित करण्यात त्यांचे योगदान असल्याने त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. यात मुंबई विभागातील पॉईंटमन सुनील पाटील यांनी 7 जूनला ओएचई वायर तुटलेली व आग लागल्याची माहिती मिळाल्याने घटनास्थळ गाठत अग्निशमन यंत्राचा वापर करून आग विझविल्याने रेल्वेचे मोठे नुकसान टळले. भुसावळ विभागातील बडनेरा येथील ट्रॅक मेंटेनर रमेश सखाराम यांनी कर्तव्यावर असताना बडनेरा यार्डात पॉईंट 121 वर रेल्वेचे भगदाड पडलेले पाहिल्यावर तात्काळ गाडीला लाल सिग्नल दाखवून मालगाडी थांबवल्याने दुर्घटना टळली तर नागपूर विभागातील गणेश युवाने एका गाडीच्या डब्याचे हॉट अॅक्सल पाहून लाल सिग्नल देत गाडी थांबविण्याचा प्रयत्न केला होता, मात्र गाडी थांबली नसल्याने ओएचई पुरवठा खंडीत करून गाडी थांबवल्याने मोठा अपघात टळला होता. सोलापूर विभागातील कुर्डूवाडी येथे मालगाडीचे असिस्टंट लोको पायलट वैभव शर्मा इंजिनची तपासणी करीत असताना हेलिकल रींग तुटलेली आढळल्यानंतर संबंधितांना कळविल्याने अपघात टळला होता. या कार्यक्रमास अतिरीक्त महा व्यवस्थापक आलोकसिंग, प्रधान मुख्य संचालन व्यवस्थापक मुकूल जैन, राजेश अरोरा, एन.पी.सिंग, मनिंदर उप्पल आदी अधिकारी यावेळी उपस्थित होते.
