प्रिंट मीडियाचा प्रभाव अद्यापही कायम : सुरेश उज्जैनवाल
मुक्ताईनगर : सध्या प्रसार माध्यम, प्रिंट मीडियापुढे मोठी आव्हानं उभी ठाकलेली आहेत. प्रिंट मीडिया सध्या संक्रमण अवस्थेतून जात आहे. असे असले तरीही प्रिंट मीडियाचा प्रभाव मात्र संपलेला नाही. पत्रकारीता हे एक कौशल्य, एक जादुगिरी आहे त्यासाठी आपल्या कर्तव्याशी इमानदार, एकनिष्ठ असणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार तथा व्हाईस ऑफ मीडियाचे जिल्हाध्यक्ष सुरेश उज्जैनवाल यांनी मुक्ताईनगर येथे केले. मुक्ताईनगर येथील संत मुक्ताई पत्रकार बहुउद्देशीय मंडळाच्या वतीने 2 जुलै रोजी शहरातील पेन्शनर भवनच्या सभागृहात पत्रकारांसाठी एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रम प्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून ज्येेष्ठ पत्रकार सुरेश उज्जैनवाल यांची उपस्थिती होती.
यांची कार्यक्रमास उपस्थिती
अध्यक्षस्थानी संत मुक्ताई पत्रकार बहुउद्देशीय मंडळाचे अध्यक्ष शरद बोदडे हे होते. प्रमुख अतिथी म्हणून बोदवड येथील व्हॉईस ऑफ मीडियाचे तालुकाध्यक्ष संदीप वैष्णव हे उपस्थित होते. प्रास्ताविक पत्रकार मंडळाचे उपाध्यक्ष विनायक वाडेकर यांनी केले. याप्रसंगी उज्जैनवाल म्हणाले की सध्या प्रिंट मीडिया सुरू ठेवणे ही एक तारेवरची कसरत आहे. प्रिंट मीडिया सध्या संक्रमण अवस्थेतून जात आहे परंतु समाजाचा आजही प्रिंट मीडियावर अर्थात लोकशाहीच्या या चौथ्या स्तंभावर विश्वास आहे कारण समाजाला या प्रसार माध्यमाची गरज आहे. दररोज नव्हे तर क्षणाक्षणाला विविध घडामोडी घडत आहेत त्यामुळे पत्रकारांनी अपडेट असणे गरजेचे आहे. आजच्या घडीला पत्रकारांसमोर मोठी आव्हाने आहेत. शोधक पत्रकारीता करीत असताना ज्ञानाचा व आत्म्याचा शोध घेणे गरजेचे आहे. आपल्या कर्तव्याशी इमानदार राहिल्यास पत्रकारीता क्षेत्रातही मोठं यश संपादन करता येते कारण प्रत्येक व्यक्ती ही युनिक आहे. सत्य मांडण्याची वृत्ती लोप पावू देऊ नका, पत्रकारीतेवरील जनतेच्या विश्वासाची ज्योत कधीही विझू देऊ नका, असे आवाहनही उज्जैनवाल यांनी केले.

डिजिटल युगातही प्रिंटचे महत्व अबाधीत
पत्रकार मंडळाचे अध्यक्ष शरद बोदडे यांना पीडित वंचित अन्यायग्रस्त यांचा आवाज बुलंद करण्याचे काम प्रसार माध्यमे करीत आहेत. पत्रकारीता क्षेत्रात समाजाबद्दलची संवेदनशीलता अद्यापही कायम असल्यानेच आजच्या डिजिटल युगातही जनतेच्या विश्वासाचा महत्वाचा माध्यम हे प्रसार माध्यमच आहे त्यामुळे कितीही प्रतिकूल परीस्थिती आली तरीही जनतेच्या विश्वासास तडा जाऊ देता कामा नये, असे मतही बोदडे यांनी व्यक्त केले.
यांची कार्यक्रमास उपस्थिती
याप्रसंगी पत्रकार मंडळाचे सल्लागार मतीन शेख, सचिव संदीप जोगी, उपाध्यक्ष विनायक वाडेकर, मुक्ताई वार्ताचे संपादक संतोष मराठे, अमोल वैद्य, दीपक चौधरी, मोहन मेढृ, राजेश पाटील, संजय वाडीले, छबीलदास पाटील, महेंद्र पाटील, देवेंद्र काटे, बोदवडचे पत्रकार निवृत्ती ढोले, अमोल अमोदकर, नाना पाटील आदींची उपस्थिती होती. सूत्रसंचालन संदीप जोगी यांनी तर आभार मतीन शेख यांनी मानले.
