चांगले व वाईटाबद्दल ज्ञान देणारे गुरू : हभप दीपक महाराज
जय गणेश ज्येष्ठ नागरीक संघातर्फे गुणवंतांचा सन्मान
Guru who imparts knowledge about good and evil : Habap Deepak Maharaj भुसावळ : श्री जय गणेश ज्येष्ठ नागरीक संघ, सुरभी नगर भुसावळची साप्ताहिक सभा संघाचे अध्यक्ष आर.आर.बावस्कर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. अरुण मांडळकर यांच्या प्रतिमेचे पूजन हभप दीपक महाराज यांनी केले. मंगला वाणी यांनी प्रमुख वक्ते हभप दीपक महाराज यांचा परीचय दिला. दहावी परीक्षेत गुणवंतांचा यावेळी भेटवस्तू देवून सन्मान करण्यात आला. संघाच्या उपाध्यक्ष जयश्री ढाके यांनी त्यांच्या नातवाने एचएससी परीक्षेत कशाप्रकारे मेहनत घेऊन यश संपादन केले याबाबत मार्गदर्शन केले. नंतर रोटरी क्लब ऑफ भुसावळ रॉयल्स आणि सिद्धेश टूर्स व ट्रॅव्हल्सच्या संचालकांनी ज्येष्ठ नागरीकांना क्षेत्रभेटी व तीर्थयात्रेसाठी सवलत सुविधा उपलब्ध करून दिल्याची माहिती दिली.
गुरुविण देव नाही दुजा
हभप दीपक महाराज यांनी ‘गुरुविण देव नाही दुजा’ या विषयावर प्रवचन दिले. ते म्हणाले की, जगात गुरू, गुरुजी, आचार्य व सद्गुरु असे चार प्रकारचे गुरु असतात. चांगले व वाईट याबद्दल जे ज्ञान देतात ते गुरू तर जे शाळा महाविद्यालयायातून औपचरीक शिक्षण देतात हे गुरूजी. आचरणातून जे शिष्याला ज्ञान देतात ते आचार्य व जे जीवन जगण्यासाठी आध्यात्मिक ज्ञान देतात ते सदगुरू. आजच्या काळात ग्रंथ हेच आपले खरे गुरु आहेत कारण ग्रंथांमधून व्यक्तीला सदाचाराची शिकवण मिळते, असे ते म्हणाले. सल्लागार दिनकर जावळे यांनी श्री गजानन विजय ग्रंथ पारायण कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली. अध्यक्ष आर.आर.बावस्कर यांनी श्री संत ज्ञानेश्वर व संत नामदेव व एक कुप्रसिद्ध चोर यांची कथा सांगून ईश्वर कोणत्याही रूपात खर्या भक्तांना केव्हाही भेटतो, असे सांगितले. उपाध्यक्ष जयश्री ढाके यांनी आभार मानले. सूत्रसंचालन सचिव डी.एम.तिडके यांनी केले.

