भुसावळातील रेल्वे उत्तर वॉर्डात कमी दाबाने वीजपुरवठा
भुसावळ : शहरातील रेल्वे उत्तर वॉर्डात अत्यंत कमी दाबाने वीजपुरवठा होत असल्याने नागरीकांकडील महागडी वीज उपकरणे वारंवार खराब होत आहे. या संदर्भात दखल घेतली जात नसल्याने उर्जा मंत्री अजित पवार यांच्याकडे माजी नगरसेवक उल्हास भीमराव पगारे यांनी तक्रार केली आहे.
तर लोकशाही मार्गाने आंदोलनाचा इशारा
तक्रारीचा आशय असा की, रेल्वे उत्तर वॉर्डातील कवाडे नगर, आंबेडकर नगर, दादासाहेब रूपवते सोसायटी, नालंदा नगर, द्वारका नगर भागात शंभर एचपीची डीपी लावण्यात आल्याने या भागात अत्यंत कमी दाबाने वीजपुरवठा होत आहे. परीणामी नागरीकांकडील वीज उपकरणे वारंवार नादुरुस्त होत आहेत. वारंवार शॉर्टसर्किट होत असल्याने पावसाळ्यात अप्रिय घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तातडीने डीपीची क्षमता दोनशे एच.पी.करून नागरीकांना दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे मात्र मागणीची दखल न घेतल्यास लोकशाही मार्गाने आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
