वरणगाव नगरपरीषद स्थलांतराला विरोध : दोन तास ठिय्या आंदोलन
नगरपरीषद स्थलांतर विरोधी कृती समितीचे आंदोलन : मुख्याधिकारी उपस्थित न राहिल्याने संताप
भुसावळ : 15 दिवसांपूर्वी वरणगाव नगरपरीषद स्थलांतर विरोधी कृती समितीतर्फे नगरपरीषदेचे मुख्याधिकारी समीर शेख यांना निवेदन देऊन मंगळवार, 11 जुलै रोजी नगरपरीषद स्थलांतर विरोधी कृती समितीतर्फे लोकशाही मार्गाने महामोर्चा काढण्यात येणार असल्याची कल्पना दिली होती शिवाय व्यक्तीशा उपस्थितीचे कळवूनही मुख्याधिकारी मंगळवारी आंदोलक नगरपरीषदेत आल्यानंतरही उपस्थित न राहिल्याने महामोर्चा नगरपरीषदेत आल्यानंतर मुख्याधिकारी कार्यालयात नसल्याने कृती समितीचे सदस्यांनी आणि गावकर्यांनी संतप्त होऊन दोन तास खाली बसून ठिय्या आंदोलन केले. जोपर्यंत मुख्याधिकारी येथे येत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही, असा पवित्रा कृती समितीने घेतला.
प्रांताधिकार्यांसोबत बैठकीचे आश्वासन
महामोर्चातील नागरीकांच्या संतप्त भावना लक्षात घेऊन सहाय्यक निरीक्षक आशिषकुमार अडसूळ आणि ओएस सूर्यवंशी यांनी मुख्याधिकार्यांना ही बाब लक्षात आणून दिली. त्यानंतर मुख्याधिकार्यांनी फोनद्वारे कृती समितीचे सदस्यांसोबत प्रांत यांच्यासोबत तुमची बैठकीचे आश्वासन दिल्यानंतर ठिय्या आंदोलन मागे घेऊन कृती समितीतर्फे ओ.एस.पंकज सूर्यवंशी यांना निवेदन देण्यात आले.

मोर्चाने दणाणले शहर
वरणगाव नगरपरीषद स्थलांतर विरोधी कृती समितीतर्फे मंगळवार, 11 जुलै रोजी ‘नगरपरिषद स्थलांतर विरोध’ महामोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी अकरा वाजता भोगावती नदी पात्र येथील ग्रामदैवत रेणुका माता मंदिरात रेणुका मातेला पुष्पहार अर्पण करून महामोर्चाला सुरुवात करण्यात आली. महामोर्चात वरणगाव शहरातील विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते, तरुण युवक, सामाजिक संघटनेचे अध्यक्ष, विविध समाजाचे अध्यक्ष, गणेश मंडळ, दुर्गा मंडळ यांचे अध्यक्ष, महिला, बाजाराचा दिवस असल्यावरही व्यापारी मोठ्या संख्येने या महामोर्चात सहभागी झाले होते. विविध घोषणांनी शहर दणाणले होते.
कृती समितीचे दोन तास ठिय्या आंदोलन
नगरपरीषदेचे मुख्याधिकारी समीर शेख यांना पंधरा दिवसांपूर्वी 11 जुलैला वरणगाव नगरपरीषद स्थलांतर विरोधी कृती समितीतर्फे महामोर्चा येणार असल्याची कल्पना देवूनही ते मंगळवारी उपस्थित न राहिल्याने आंदोलकांनी संताप व्यक्त केला. मुख्याधिकारी जळगाव येथे बैठकीला गेल्याचे सांगण्यात आल्यानंतर कृती समिती सदस्यांनी आणि गावकर्यांनी संतप्त होऊन मुख्याधिकारी जोपर्यंत येथे येत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही, अशी आक्रमक भूमिका घेत दोन तास ठिय्या आंदोलन केले. शेवटी दोन तासानंतर कायदा सुव्यवस्था बिघडू नये म्हणून वरणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक निरीक्षक आशिषकुमार अडसूळ यांनी जिल्हाधिकारी आणि मुख्याधिकारी यांना ही माहिती कळवली. त्यानंतर मुख्याधिकारी यांनी कृती समितीच्या सदस्यांसोबत बुधवारी प्रांत अधिकारी त्यांच्यासोबत बैठक लावण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर संतप्त झालेले कृती समिती सदस्य आणि गावकरी यांनी ठिय्या आंदोलन मागे घेऊन ओ.एस.पंकज सूर्यवंशी व सहा.निरीक्षक अडसूळ यांना कृती समितीतर्फे निवेदन दिले.
कृती समिती सदस्यांनी मांडल्या भूमिका
वरणगाव नगरपरीषद स्थलांतर विरोधी कृती समिती अध्यक्ष आशिष चौधरी, उपाध्यक्ष अशपाक काझी, सचिव महेश सोनवणे, सहसचिव संतोष माळी, अजय पाटील, शशिकांत चौधरी, अॅड.चंद्रकांत शर्मा यांनी यावेळी सांगितले की, ही महामोर्चाच्या माध्यमातून सुरुवात आहे. भविष्यात लोकशाही मार्गाने रस्त्यावर उतरण्याची वेळ आल्यास ते देखील करण्यात येईल, वेळ पडल्यास आत्मदहनाचा इशारा देखील समिती सदस्यांनी दिला.
यांचा महामोर्चात सहभाग
या महामोर्चात कृती समिती अध्यक्ष आशिष चौधरी, उपाध्यक्ष अशफाक काझी, सचिव महेश सोनवणे, सहसचिव संतोष माळी, भास्कर गवळी, शशिकांत चौधरी, चंद्रकांत शर्मा, अतुल झाबरे, अजय पाटील, मनोज कोलते, सुनील भोई, संजीव कोळी, संदीप वाघ, अजय सोनार, किरण माळी, सुनील डोयसे यांच्यासह गावातील विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते, समाजाचे अध्यक्ष, व्यापारी बंधू, युवक तरुण मोठ्या संख्येने सहभागी होते. वरणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक निरीक्षक आशिषकुमार अडसूळ, परशुराम दळवी, किशोर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मोठया पोलिस बंदोबस्तात महामोर्चा शांततेत पार पडला.
