यावल गटविकास अधिकार्‍यांवर कारवाईसाठी मुंबईत बिर्‍हाड मोर्चा

रीपाइं जिल्हाध्यक्ष राजू सूर्यवंशी : पंचायत समितीला दलालांचा विळखा


भुसावळ : यावल गटविकास अधिकार्‍यांची बदली करावी, पंचायत समितीतील दलालांचा विळखा हटवावा, सर्वसामान्यांसह गोरगरीब व आदिवासी बांधवांना न्याय मिळावा व तसेच भ्रष्ट अधिकार्‍यांवर कारवाई करावी मागण्यांसाठी पावसाळी अधिवेशनात मुंबईत मंत्रालयावर बिढार मोर्चा काढण्याचा इशारा रीपाइं जिल्हाध्यक्ष राजू सूर्यवंशी यांनी येथे बुधवारी दिला. सूर्यवंशी यांच्या निवासस्थानी आयोजित पत्रकार परीषदेत ते बोलत होते.

गटविकास अधिकार्‍यांवर रोष
रीपाइं आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष राजू सूर्यवंशी म्हणाले की, यावल पंचायत समितीचे गटविकास अधिकारी नियमित कार्यालयात येत नसल्याने गोरगरीबांची कामे होत मागासवर्गीयांसाठी असलेल्या योजनांचा लाभ मिळत नाही तसेच या कार्यालयात दोन दलाल कामे करीत असून तेच त्यांच्या घरी टेंडर (निविदा) भरतात, सरकारी की यांच्याकडेच राहते, कोट्यवधींची कामे ठराविक ठेकेदार आपसात वाटून घेतात, असा आरोप सूर्यवंशी यांनी केला.

वनविभागाच्या अधिकार्‍यांनी विकले जंगल
यावल वनविभागाच्या अधिकार्‍यांनी जंगलच विक्रीला काढले असल्याचा आरोप राजू यांनी केला. संबंधित वरीष्ठ अधिकार्‍यांकडे सागवान लाकडाबाबत तक्रार केली मात्र त्यांनी दलालाच कारवाईची माहिती कळवली, असा आरोप त्यांनी केला. आदिवासींकडून शेतीसाठी हप्ते घेतले जात असल्याचा आरोप त्यांनी करीत यावल पंचायत समितीतील सपकाळे नामक अधिकारी अनेक वर्षांपासून ठिय्या मांडून असल्याने त्यांची तत्काळ बदली करावी, अशी मागणीही सूर्यवंशी यांनी केली.

यावल ग्रामपंचायतींचे ऑडीटच नाही
यावल तालुक्यातील हिंगोणासह मारूळ व हंबर्डीसह अनेक ग्रामपंचायती आहेत त्यांचे ऑडिट करण्यात आलेले नाही. आदिवासी बांधवांसाठी ठक्कर बाबा योजना असून त्याचे लाभार्थी कागदावर आहे त्यामुळे कोट्यवधींचा निधी जातो कुठे? असा प्रश्न त्यांनी उपस्थित करीत आदिवासी शाळेत मुलांना प्रवेश दिला जात नसल्याचा आरोप करीत रेशनचा माल गरीबांच्या बोगस याद्या करून काळ्या बाजारात विकला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. या सर्व भ्रष्टाचाराची चौकशी करावी तसेच गटविकास अधिकार्‍यांवर निलंबनाची कारवाई न झाल्यास मंत्रालयावर हजारो आदिवासींना घेवून ‘बिर्‍हाडं मोर्चा’ काढणार असल्याचा इशारा राजू सुर्यवंशी यांनी दिला. यावेळी विष्णू पारधे, बाळू सोनवणे व सुनील ढिवरे उपस्थित होते.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !