भुसावळात दहावी, बारावीची उद्यापासून पुरवणी परीक्षा
भुसावळ : इयत्ता दहावी व बारावीच्या पुरवणी परीक्षेला मंगळवारपासून (दि. सुरुवात होत आहे. इयत्ता बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठी जामनेर, मुक्ताईनगर, बोदवड व भुसावळ या चार तालुक्यांसाठी भुसावळातील नाहाटा महाविद्यालय हे केंद्र असेल तर दहावीच्या पुरवणी परीक्षेसाठी भुसावळ तालुक्यासाठी वरणगाव, मुक्ताईनगर व जामनेर या केंद्रांवर परीक्षा होणार आहे.
अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुन्हा संधी
दहावीची पुरवणी परीक्षा 18 जुलै ते 1 ऑगस्ट व बारावीची परीक्षा 18 जुलै ते 8 ऑगस्ट दरम्यान होईल. फेब्रुवारी व मार्चमध्ये अनुत्तीर्ण झालेल्या दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जावू नये तसेच त्यांना पुन्हा परीक्षेची संधी मिळावी या उद्देशाने राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावी व बारावीची पुरवणी परिक्षा घेतली जाणार आहे. या परीक्षांना 18 जुलैपासून सुरवात होईल.
इयत्ता दहावीसाठी जामनेर येथील न्यू इंग्लिश स्कूल या केंद्रात 58, वरणगाव येथील महात्मा गांधी विद्यालयात 90 तर मुक्ताईनगरच्या जे. ई. स्कूल या केंद्रात 81 विद्यार्थी प्रविष्ठ झाले आहेत. भुसावळ तालुक्यातील अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी महात्मा गांधी विद्यालय, वरणगाव हे केंद्र आहे. इयत्ता बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठी जामनेर, मुक्ताईनगर, बोदवड व भुसावळ या चार तालुक्यांसाठी नाहाटा महाविद्यालय हे केंद्र आहे. यात बारावीच्या कला, विज्ञान व वाणिज्य शाखेतील 97 विद्यार्थी पुरवणी परीक्षेसाठी प्रविष्ठ आहेत, अशी माहिती गटशिक्षणाधिकारी किशोर वायकोळे यांनी दिली.
