केळीवर आकारण्यात येणारी तीन टक्के सूट रद्द : यावल कृउबाचा निर्णय


Cancellation of three percent discount levied on bananas : Yaval Kriuba’s decision
यावल :
केळी कापणी करतांना व्यापारी वर्गाकडून घेण्यात येणारी तीन टक्के सूट रद्द करण्याचा निर्णय संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. सोमवारी संचालक मंडळाची बैठक बाजार समितीत झाली. यात या निर्णयाचे उल्लंघण केल्याची तक्रार आल्यास संबंधीत व्यापार्‍यावर कठोर व कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला. संचालक मंडळाच्या या निर्णयाचे शेतकर्‍यांनी स्वागत केले आहे.

तर व्यापार्‍यावर कठोर कायदेशीर कारवाई होणार
यावल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाची मासिक सभा सोमवारी पार पडली. यात केळीचा विषय घेण्यात आला. व्यापारी वर्ग केळी कापणी केल्यावर केळीचे मोजमाप झाल्यानंतर गाडीचे वजन इलेक्ट्रॉनिक तोल काट्यावर करतात व त्यावर व्यापार्‍यांकडून तीन टक्के सूट म्हणजे कटती घेण्यात येत. शेतकर्‍यांच्या केळीचे एकूण वजनात तीन टक्के इतके वजन कमी केल्याने त्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत होते. याकडे बाजार समितीने लक्ष ठेवत शेतकर्‍यांचे आर्थिक नुकसान टाळावे यासाठी केळीवर आकारण्यात येणारी तीन टक्के सूट रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला व त्याची अंमलबजावणीदेखील तत्काळ करण्याचे आदेश देण्यात आलेे. याबाबत तक्रार उद्भवल्यास व्यापार्‍यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्याचा थेट ठराव बाजार समितीने घेतला आहे. या मासिक सभेतच्या अध्यक्षस्थानी सभापती हर्षल पाटील होते. सभेत उपसभापती बबलू कोळी, नारायण चौधरी, उमेश पाटील, राकेश फेगडे, सूर्यभान पाटील, सागर महाजन, अशोक चौधरी, पंकज चौधरी, दीपक चौधरी, संजय पाटील, उज्जैनसिंग राजपूत, यशवंत तळेले, विलास पाटील, सुनील बारी, कांचन फालक, राखी बर्‍हाटे सह आदींची उपस्थिती होती. सभेचे विषय वाचन सचिव स्वप्निल सोनवणे यांनी केले.

व्यापार्‍यांना दिले पत्र
केळी कापणीनंतर वजनातील तीन टक्के कटतीच्या निर्णयाबाबतची माहिती बाजार समितीच्या वतीने सर्व परवानाधारक केळी व्यापारी, कमिशन एजंट यांना माहितीस्तव देण्यात आली असून तीन टक्के सूट रद्द केली म्हणून शेतकर्‍यांमधून समाधान व्यक्त होत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !