बोदवड तालुक्यात रासायनिक खतांमुळे मक्यासह कापसाचे नुकसान
बोदवड : रासायनिक खतांमुळे मक्यासह कापूस पिकाचे नुकसान झाल्याची तक्रार बोदवड तालुक्यातील शेतकर्यांनी कृषी विभागाकडे केली आहे. बोदवड तालुक्यातील मनूर येथील शेतकरी जनार्दन खेलवाडे यांच्या मनुर बु.॥ शिवारातील गट क्रमांक 306/2 मध्ये तसेच शेतकरी सुधीर खेलवाडे यांच्या शेतातील मक्यासह कपाशीला रासायनिक खत दिल्यानंतर पिके जळाल्याची तक्रार त्यांनी कृषी अधिकारी के.सी.पाडवी यांच्याकडे केली आहे. याच पद्धत्तीने नऊ गावांमध्ये असे प्रकार घडल्याची माहिती आहे. या संदर्भात एकूण 21 शेतकर्यांच्या तक्रारी असून शेतकर्यांनी बोदवड शहरातील जय अंबिका अॅग्रो, नाडगाव रोड या कृषी केंद्रावरून खतांची खरेदी केल्याचे सांगितले.
शेतकर्यांवर हंगामात मोठा आघात
आठ दिवसांनी खत दिल्यानंतर मका व कपाशी पूर्णपणे वाळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर शेतकर्यांना मोठा धक्काच बसला. शेती हेच शेतकर्यांचे उदरनिर्वाहाचे साधन असल्याने व हंगामात पिकाला फटका बसल्याने शासन आता काय भूमिका घेवून शेतकर्यांना भरपाई देते? याकडे शेतकर्यांचे लक्ष लागले आहे. कृषी विक्रेत्यांकडून 346 फॉस्फेट बॅगा जप्त केल्या असल्याचे गुणवत्ता निरीक्षण अधिकारी धाडे यांनी सांगितले. बोदवड तालुक्यातील 21 शेतकर्यांना खते विकण्यात आले असून नऊ शेतकर्यांनी बिले सादर केली असून त्याबाबत पंचनामा करून अहवाल शासनाला पाठवण्यात येईल व ज्या शेतकर्यांना नुकसान झाले असून त्यांनी कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन कृषी अधिकार्यांनी केले आहे. जय अंबिका अॅग्रो केंद्राचे संचालक दीपक पाटील म्हणाले की, कंपनीकडून सीलबंद जीएसटी बिलासह खतांचा पुरवठा घेतला व हीच खते शेतकर्यांना पुरवण्यात आली. आपण स्वतः शेतकरी असल्याने शेतकर्यांच्या पाठीशी आहोत.
