तीन लाखांचे लाच प्रकरण : भुसावळ बाजारपेठ पोलीस निरीक्षकांसह तिघांची न्यायालयीन कोठडीत रवानगी

सोमवारी होणार संशयितांच्या जामिनावर निर्णय : न्यायालयात आवारात प्रचंड गर्दी


Three lakhs bribe case : Bhusawal market police inspector along with three sent to judicial custody भुसावळ : बायोडिझेल प्रकरणात सहआरोपी न करण्यासाठी तडजोडीअंती तीन लाखांची लाच मागितल्याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्यासह पोलीस नाईक तुषार पाटील व ऋषी शुक्ला यांना मंगळवारी अटक करण्यात आली होती. संशयितांना एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आल्यानंतर गुरुवारी दुपारी भुसावळ अतिरीक्त सत्र न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली. दरम्यान, संशयितांतर्फे जामिनासाठी अर्ज करण्यात आल्यानंतर दोन्ही बाजूंनी युक्तीवाद सादर झाल्यानंतर सोमवार, 24 जुलै रोजी आता जामिनावर निर्णय होणार असल्याने संशयितांची जळगाव सबजेलला रवानगी करण्यात आली.

असे आहे तीन लाखांचे लाच प्रकरण
भुसावळातील दोघांविरोधात बायोडिझेल प्रकरणात गुन्हा दाखल झाला होता व याच प्रकरणात सहआरोपी न करण्यासाठी तक्रारदाराच्या मित्राकडे भुसावळातील ऋषी शुक्ला याने पाच लाखांची लाच मागून तीन लाखात तडजोड केली होती. पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड व तुषार पाटील यांच्या माध्यमातून ही लाच मागितल्याचा आरोप असल्याने तक्रारदाराने धुळे एसीबीकडे तक्रार नोंदवली. मंगळवार, 18 रोजी भेटीचे ठिकाण निश्चित झाल्यानंतर तक्रारदाराने भुसावळ-बोदवड रस्त्यावरील विचवा गावाजवळ ऋषी शुक्ला यांना दुपारी तीन लाखांची रक्कम देताच एसीबीने त्यांना अटक केली तर याप्रकरणात पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड व नाईक तुषार पाटील यांचा सहभाग असल्याचा आरोप असल्याने त्यांनादेखील मंगळवारी सायंकाळी उशिरा अटक करण्यात आली.

पोलीस अधिकार्‍यांसह तिघांची सबजेलला रवानगी
लाच प्रकरणातील तीन्ही संशयितांना बुधवारी एका दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आल्यानंतर गुरुवारी दुपारी एसीबीने सत्र न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन्ही बाजूचा युक्तीवाद ऐकून न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली.

संशयितांच्या जामिनावर होणार सोमवारी निर्णय
भुसावळ सत्र न्यायालयात पोलीस निरीक्षकांसह तिघांच्या जामिनावर युक्तीवाद करताना सरकारी वकील अ‍ॅड.मोहन देशपांडे यांनी तर संशयितातर्फे अ‍ॅड.सागर चित्रे, अ‍ॅड.मनीष सेवलानी, अ‍ॅड.तुषार पाटील व अ‍ॅड.बी.ए.पाटील यांनी बाजू मांडली तसेच जळगाव एसीबीतर्फे पोलीस उपअधीक्षक सुहास देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली एसीबीचे पोलीस निरीक्षक अमोल वालझडे यांनी बाजू मांडली. दोन्ही बाजूचा युक्तीवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने सोमवार, 24 रोजी जामिनावर निर्णय देण्याचे सांगितल्यानंतर संशयितांची जळगाव सबजेलला रवानगी करण्यात आली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !