मतदान हा लोकशाहीतील महत्वाचा अधिकार व कर्तव्य : कैलास कडलग
फैजपूर : जगातील सर्वात मोठ्या लोकशाही देशात नागरीक म्हणून आपल्याला प्राप्त झालेला सर्वात मोठा अधिकार म्हणजे मतदानाचा असून योग्य व्यक्तीला निवडून देणे हे प्रत्येक भारतीयाचे परम कर्तव्य आहे. मतदानाचा अधिकार तेव्हाच बजावता येईल ज्यावेळेस अठरा वर्ष वयावरील तरुण-तरुणींनी मतदार यादीत स्वतःचे नाव नोंदविले असेल त्यामुळे अठरा वर्षे पूर्ण होताच आपण स्वतःचे नाव मतदार यादीत नोंदवून परीवारात आणि समाजात याबद्दल जनजागृती करावी, असे आवाहन फैजपूर प्रांताधिकारी कैलास कडलग यांनी केले. तापी परीसर विद्या मंडळ संचलित धनाजी नाना महाविद्यालयाच्या इंटरनल कॉलिटी अशुरंस सेल (आयक्यूएसी) व तहसील कार्यालय, यावल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मतदान जनजागृती अभियानांतर्गत कार्यक्रमात बोलत होते.
यांची व्यासपीठावर उपस्थिती
याप्रसंगी व्यासपीठावर यावल तहसीलदार मोहनमाला नाझीरकर, निवडणूक नायब तहसीलदार आर.आय.तडवी, नायब तहसीलदार धनश्री पवार, धनंजय चौधरी, प्रभाकर आप्पा सोनवणे, उपप्राचार्य डॉ.व्ही.सी.बोरोले, उपप्राचार्य डॉ.एस.व्ही.जाधव, डॉ.आय.पी.ठाकूर यांच्यासह तहसील कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी, बुथ लेवल ऑफिसर्स व विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जागरूक मतदार मोलाची भूमिका निभावणार : तहसीलदार
प्रांताधिकारी कैलास कडलग यांनी मतदारयादीत नाव समाविष्ट करून घेण्याची प्रक्रिया अत्यंत साध्या, सोप्या आणि सरळ शब्दात विषद केली. यासोबत अचूक फॉर्म कसा भरावा ? याची प्रात्यक्षिके सादर केलीत. प्रत्येकाने स्वतःचे परम कर्तव्य मानून मतदार यादीत स्वतःचे नाव नोंदवावे, असेही ते म्हणाले. तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांनी फैजपूरच्या ऐतिहासिक भूमीचा दाखला देत अवघ्या देशाला स्वातंत्र्यप्राप्तीसाठीची प्रेरणा या भूमीने दिलेली असून याच भूमीतून जागरूक मतदार देशाच्या राजकारणात व समाजकारणात अत्यंत मोलाची भूमिका पार पाडू शकतात, अशी खात्री व्यक्त केली व तहसील कार्यालयाच्या वतीने नव मतदारांना आवश्यक ते सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. धनंजय चौधरी यांनी तहसील कार्यालयाच्या स्तुत्य उपक्रमाबद्दल अभिनंदन करीत मधुस्नेह परीवाराच्या विविध संस्था व महाविद्यालयांच्या माध्यमातून शासनाला आवश्यक ती सहकार्य करण्यास सदैव तत्पर व सज्ज असल्याचे प्रतिपादन केले.
यांची कार्यक्रमास उपस्थिती
यावेळी 18 वर्ष वयोगटावरील काही विद्यार्थ्यांचे मतदार यादीत नाव समाविष्ट करून घेण्याचे फॉर्म भरून घेण्यात आले व ज्यांची नावे नाहीत त्यांच्यासाठी फार्म उपलब्ध करून लवकर ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी कार्यवाही करण्यात आली.
सूत्रसंचालन कॅप्टन डॉ.राजेंद्र राजपूत यांनी केले. यशस्वीतेसाठी प्राचार्य डॉ.पी.आर.चौधरी, कनिष्ठ पर्यवेक्षक प्रा.उत्पल चौधरी, आयक्यूएसी समन्वयक डॉ.हरीश नेमाडे, डॉ.हरीश तळेले, प्रा.शिवाजी मगर, शेखर महाजन, प्रा.उमेश जोशी, प्रा.सचिन पाटील, प्रा.दिलीप बोदडे, श्रीराम सैंदाणे, संजय राजपूत, तुषार जाधव यांनी सहकार्य केले.
