राजकारण पेटले : मुक्ताईनगरच्या नगराध्यक्ष नजमा तडवी यांच्या अपात्रतेला स्थगिती


Politics on fire : Muktainagar Mayor Najma Tadvi’s disqualification stayed मुक्ताईनगर : राजकीय दबावामुळे मुक्ताईनगर येथील तडवी समाजाच्या नगराध्यक्षांना अपात्र केल्याचा आरोप चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांनी अलीकडेच विधानसभेत केल्यानंतर राजकारण ढवळले असतानाच नजमा तडवी यांच्या अपात्रतेला स्थगिती देण्यात आल्यानंतर मुक्ताईनगरात राजकारण ढवळून निघाले आहे. दरम्यान, याप्रकरणी लवकरच मुख्यमंत्र्यांकडे सुनावणी होणार आहे.

सहा महिन्यात जातप्रमाणपत्र सादर न केल्याने अपात्र
जातवैधता प्रमाणपत्र प्रकरणी येथील नगराध्यक्षा सुरेखा अफजल तडवी उर्फ नजमा इरफान तडवी यांना जिल्हाधिकार्‍यांनी अपात्र केले होते. मुक्ताईनगर नगरपंचायतीच्या लोकनियुक्त नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत नजमा तडवी यांनी भारतीय जनता पक्षातर्फे निवडणूक लढविली होती. हे नगराध्यक्षपद अनुसूचित जमातीसाठी राखीव असल्याने नियमानुसार त्यांनी सहा महिन्यांच्या आत आणि सुधारित निर्देशानुसार एक वर्षाच्या आत आपले जात प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक होते. मात्र पाच वर्षे उलटण्याच्या मार्गावर असतांना देखील त्यांनी अद्यापही जात वैधता प्रमाणपत्र सादर केले नव्हते. या पार्श्वभूमीवर, गिरीश रमेश चौधरी यांनी जळगावच्या जिल्हाधिकार्‍यांकडे नजमा तडवी यांना अपात्र करण्यात यावे, अशा मागणीचे अपिल केले होते. यावर सुनावणी झाल्यानंतर जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी नजमा तडवी यांना 8 नोव्हेंबर 2021 रोजी अपात्र ठरविले होते.

जिल्हाधिकार्‍यांचा निर्णय स्थगित

दरम्यान, नजमा तडवी यांनी आमदार चंद्रकांत पाटील आणि आमदार मंगेश चव्हाण यांच्या माध्यमातून मंत्री गिरीश महाजन व पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना भेटल्या. यातून आज त्यांच्या अपात्रतेला स्थगिती देण्यात आली आहे. अर्थात जळगाव जिल्हाधिकार्‍यांचा अपात्रतेचा निर्णय हा स्थगित करण्यात आला असून ७ ऑगस्ट रोजी या प्रकरणी मुख्यमंत्र्यांकडे सुनावणी होणार आहे. याबाबतचे आदेश उपसचिव विद्या हम्पया यांनी शुक्रवारी काढले असून नजमा तडवी या सोमवारी आपल्या पदाचा कार्यभार पुन्हा सांभाळणार आहेत. मुक्ताईनगरच्याच नव्हे तर जिल्ह्याच्या राजकारणात या माध्यमातून मोठी खळबळ उडाली आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !