न्हावीतील पाच वर्षीय बालिकेचा शेतविहिरीत मृतदेह आढळला ; वडील अद्यापही बेपत्ताच
The dead body of a five-year-old girl in Nhawi was found in a field well ; The father is still missing यावल : यावल तालुक्यातील न्हावी या गावातील रहिवासी असलेली पाच वर्षीय अल्पवयीन मुलगी गेल्या तीन दिवसांपासून आपल्या वडिलांसोबत घराबाहेर पडल्यानंतर दोघे बेपत्ता झाल्याने शोध सुरू असताना शनिवारी सायंकाळी या पाच वर्षीय अल्पवयीन मुलीचा मृतदेह गावालगत असलेल्या शेत विहिरीत आढळून तर वडिल मात्र अद्यापही बेपत्ता असल्याने संभ्रम वाढला आहे. दरम्यान, फैजपूर पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह यावल ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला व शवविच्छेदन करून मृतदेह कुटुंबांना सोपवण्यात आला. याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
नेमके कारण अस्पष्ट
न्हावी, ता.यावल या गावातील मारूळ रस्त्यावर ठुशा भावलाल बारेला हा कुटुंबासह राहतो. त्यांना तीन मुली आहेत. दरम्यान तो गुरुवार, 17 ऑगस्टपासून आपल्या पाच वर्षीय मुलगी अनिता बारेला हिला घेऊन घराबाहेर पडला व बेपत्ता झाला होता. पाच वर्षीय मुलगी दुर्धर आजाराने त्रस्त होती तर शनिवारी सायंकाळी न्हावी गावाच्या शेत शिवारात असलेल्या सुनील फिरके यांच्या शेत विहिरीत या पाच वर्षीय अनिता बारेला हिचा मृतदेह आढळला. मृतदेह दिसल्यानंतर तातडीने फैजपूर पोलिसांना माहिती देण्यात आली.






घटनास्थळी फैजपूरचे डी.वाय.एस.पी. डॉ.कुणाल सोनवणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश वाघ, पोलीस उपनिरीक्षक मयनोद्दिन सय्यद, सहायक फौजदार देविदास सूरदास, महेंद्र महाजन, गुलबक्ष तडवी, सुशीला भिलाला हे पथकासह दाखल झाले व तेथून मृतदेह काढून यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये आणण्यात आला. ग्रामीण रुग्णालयामध्ये वैद्यकीय अधिकारी डॉ.शिवदास चव्हाण यांनी शवविच्छेदन केले व मृतदेह नातेवाईकांना सोपवला. दरम्यान या मुलीचे वडील देखील अद्याप बेपत्ता आहे. याप्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात छडा बारेला यांनी दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास पोलीस उपनिरीक्षक मयनोद्दीन सय्यद करीत आहे


