आयुष्यात निखळ आनंदप्राप्तीसाठी सतत कार्यमग्न रहा : प्रा.डॉ.जतीन मेढे


Be constantly busy to achieve pure happiness in life : Prof. Dr. Jatin Medhe भुसावळ : आयुष्यातील निखळ आणि सर्वोच्च आनंदप्राप्तीसाठी सतत कार्यमग्न राहणे हा सुखी जीवनाचा मार्ग आहे. त्यासाठी सज्जनहो जीवनात सतत कार्यमग्न रहा, असे प्रतिपादन प्रा.डॉ.जतीन मेढे यांनी केले. भुसावळ शहरातील अष्टभुजा ज्येष्ठ नागरीक संघातील कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते रघुनाथअप्पा सोनवणे होते.

शरीरात श्वास असेपर्यंत जगा
‘कार्यमग्नही जीवन व्हावे’ या विषयावर विचार व्यक्त करतांना प्रा.मेढे यांनी ऐतीहासिक, सामाजिक आणि शैक्षणिक सेवेत आयुष्यखर्ची घातलेल्या महापुरुषांची अनेक उदाहरणे देऊन त्यांच्या जीवनातील कार्यमग्नतेवर आपल्या प्रभावी शैलीने प्रकाश टाकला. ते म्हणाले की, आयुष्याची संध्याकाळ झाली. आम्ही वृद्ध झालो असं कधीही मनात आणू नका. आयुष्य सतत उगवत्या सूर्यासारखं तेजस्वी आणि सोनेरी किरणांनी फुललेलं ठेवा. शरीरात श्वास असेपर्यंत तुम्ही ही जगा आणि दुसर्‍याला ही जगवा….. आपलं आयुष्य सुंदर करीत असतांना दुसर्‍याच्याही जीवनात आनंद निर्मितीसाठी झटणे म्हणजे जगणे आहे. त्यासाठी परस्परांच्या साथीने सतत आवडत्या कामात कार्यमग्न राहून आनंदी जीवन जगा ! असे मौलिक विचार त्यांनी उपस्थित ज्येष्ठ बंधू आणि भगिनींना दिलेत. कार्यक्रमास मोठ्या संख्येने ज्येष्ठ नागरीक बंधू-भगिनीं उपस्थित होते. पाहुण्यांचा परीचय ज्येष्ठ सदस्य विलासराव बेंद्रे यांनी करून दिला. कार्यक्रमाची सुरुवात शिलाताई उपाध्ये यांनी गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनाने केली. शकुंतला भंगाळे यांनी राम नामाचा जप केला. संजय भंगाळे यांनी राष्ट्रगीत व पसायदान म्हणून कार्यक्रमाचा समारोप केला. सूत्रसंचालन अलका ढाके यांनी तर आभार प्रदर्शन ज्येष्ठ सदस्य संजय चापोरेकर यांनी मानले.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !