भुसावळातील अतिक्रमण मोहिमेला दिवाळीपर्यंत स्थगिती ; शिष्टमंडळाला प्रशासकांचे आश्वासन
आमदार चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वातील सर्वपक्षीय शिष्टमंडळाने घेतली प्रशासकांची भेट : दिवाळीनंतर अतिक्रमणावर कारवाई अटळ
Encroachment campaign in Bhusawal suspended till Diwali ; Administrator’s assurance to delegation भुसावळ : भुसावळ पालिकेने थकबाकीदारांविरोधात धडक मोहिम सुरू केल्यानंतर अतिक्रमण धारकांवरही कारवाई सुरू केल्याने अतिक्रमण धारकांच्या गोटात प्रचंड भीती पसरली आहे. सुमारे 20 वर्षांपासून व्यावसायीक आपापले व्यवसाय चालवत असल्याने किमान दसरा-दिवाळीपर्यंत अतिक्रमण ‘जैसे थे’ ठेवावे, गोर-गरीबांवर कारवाई करू नये तसेच थेट मालमत्तांना सील लावण्याऐवजी थकबाकीदारांना थकबाकी भरण्यासाठी टप्पे पाडून द्यावेत, अशी मागणी आमदार चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने प्रांताधिकारी तथा पालिकेचे प्रशासक जितेंद्र पाटील यांच्याकडे गुरुवारी सकाळी 11 वाजता केली. दरम्यान, अतिक्रमणावर तूर्तास दिवाळीपर्यंत कारवाई केली जाणार नाही मात्र जे अतिक्रमण यापूर्वी काढण्यात आले आहे तेथे जैसे थे परीस्थिती असेल, अशी माहिती प्रशासकांनी शिष्टमंडळाला दिली.
अतिक्रमण मोहिमेमुळे गरीबांच्या पोटावर ‘कुर्हाड’
प्रहारचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अनिल चौधरी यांनी प्रांताधिकार्यांशी चर्चा करताना सांगितले की, पालिका कराची मार्च एण्डींगला थकबाकी वसुल केली जाते मात्र आता अचानक मोहिम राबवली जात असून थेट घरांसह मालमत्तांना व शाळांना सील लावले जात असल्याची कारवाई अयोग्य आहे. थकबाकीदारांना थकबाकी भरण्याठी ठप्पे पाडून दिल्यास त्यांना सोयीचे होणार आहे शिवाय शहरातील अतिक्रमण धारक हातावर पोट भरणारे व्यावसायीक आहेत. त्यांना गाड्या लावण्यासाठी आधी पर्यायी जागा द्यावी व दसरा-दिवाळी झाल्यानंतरच त्यांचे अतिक्रमण हटवावे. पालिकेच्या मोहिमेमुळे अनेकांच्या रोजी-रोटीचा प्रश्न निर्माण झाल्याचे ते म्हणाले.

दिवाळीपर्यंत कारवाई थांबवण्याबाबत साकडे
भुसावळातील अतिक्रमण धारकांवर दसरा-दिवाळी होईपर्यंत कारवाई करू नये तसेच थकबाकीदारांवर थेट कारवाई करण्याऐवजी थकबाकी भरण्यासाठी दोन टप्पे करून द्यावेत, शिक्षणाचे पवित्र दालन असलेल्या शाळांना सील लावू नये, अशी मागणी प्रांताधिकारी जितेंद्र पाटील यांच्याकडे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वातील सर्वपक्षीय शिष्टमंडळाने केली. प्रहार जनशक्ती पक्षाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अनिल चौधरी, पीआरपीचे जगन सोनवणे, शिवसेनेचे समाधान महाजन, मनसेचे राहुल सोनटक्के यांच्यासह अतिक्रमणधारक व गाळेधारक यावेळी उपस्थित होते. थकबाकीदारांविरोधात पालिकेची मोहिम सुरूच राहणार असून तूर्त अतिक्रमण धारकांविरोधात कारवाई केली जाणार नाही मात्र अतिक्रमण हटवलेल्या ठिकाणी ‘जैसे थे’ परीस्थिती ठेवण्यात येईल, असेही प्रांताधिकारी म्हणाले.
तर रेल रोको, रास्ता रोको जगन सोनवणे
दसरा-दिवाळी हे हिंदूचे सण असून सर्वाधिक अतिक्रमित व्यावसायीक तेच असल्याने या काळात अतिक्रमण हटवल्यास त्यांच्या रोजी-रोटीचा प्रश्न निर्माण होईल. पालिकेने कारवाई न थांबवल्यास भुसावळ ते जळगाव कलेक्टर कार्यालयापर्यंत पायी मोर्चा दहा संघटनांना घेवून काढण्यात येईल तसेच 11 ठिकाणी रेल्वे रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा पीआरपीचे जगन सोनवणे यांनी दिला.
व्यावसायीकांच्या घरात पेटल्या नाहीत चुली
भुसावळ सत्र न्यायालयाबाहेर गेल्या अनेक वर्षांपासून व्यावसायीक आपल्या गाड्या लावतात शिवाय न्यायालयाची वेळ संपल्यानंतर पाच वाजेनंतर हे व्यावसायीक गाड्या लावून रात्री पुन्हा गाड्या घरी नेतात मात्र अतिक्रमण हटवल्यामुळे या व्यावसायीकांच्या पोटावर बेकारीची कुर्हाड कोसळली असल्याचे अतिक्रमण धारकांनी यावेळी सांगितले. दसरा-दिवाळीनंतर अतिक्रमण धारकांना पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी तसेच तूर्तास कारवाई थांबावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.


