कंडारीतील वनजमिनीची बनावट कागदपत्रांद्वारे विक्री : संशयिताचा जामीन फेटाळला
Sale of forest land in Kandari through forged documents : Suspect denied bail जळगाव : जळगाव तालुक्यातील कंडारी येथील वनजमिनीचे बनावट कागदपत्रे तयार करीत त्यांची विक्री कररून फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आल्यानंतर मुकूंद बलबीरसिंग ठाकूर याला अटक करण्यात आली होती. संशयिताने जामिनासाठी अर्ज दाखल केल्यानंतर न्यायालयाने तो फेटाळून लावला.
असे आहे फसवणूक प्रकरण
मुकुंद ठाकूर याने इतरांच्या मदतीने कंडारी, ता.जळगाव शिवारातील गट नंबर 375 या वनविभागाच्या मालकीच्या जमिनीचे बनावट कागदपत्रे तयार करून भूमीहिनांना शासकीय नजराणा भरून शासन जमीन देणार आहे, अशी खोटी थाप मारली होती. भूमीहिन साक्षीदारांच्या सातबारा उतार्यावर नावे लागल्याचे खोटे व बनावट सातबारे उतारे तयार करीत ते खरे असल्याचे भासवत बनावट खरेदीखत तयार करण्यात आले.


यात फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर जिल्हापेठ पोलिस ठाण्यात देण्यात आलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला होता. गुन्हा घडल्यापासून पसार असलेल्या ठाकूरला 16 सप्टेंबर 2023 रोजी अटक करण्यात आली. त्यानंतर ठाकूर याने जामिनासाठी जळगाव सत्र न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला. यावर सत्र न्यायाधीश जे.जे. मोहिते यांच्या न्यायालयात सुनावणी झाली. सरकारपक्षातर्फे अतिरिक्त शासकीय अभियोक्ता रमाकांत सोनवणे यांनी काम पाहिले.