रस्ता अडवून दरोडा : जळगाव जिल्ह्यातील त्रिकूटाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
Robbery by blocking the road : Trikuta in Jalgaon district was shackled by the police सोयगाव : जळगाव जिल्ह्यातील ई कॉम एक्स्प्रेसच्या डिलिव्हरी बॉयचा मोटारसायकलवरून रस्ता अडवून त्याच्या पोटाला चाकू लावत मुद्देमाल लुटण्यात आला होता. दरोड्याची ही घटना रविवार, 5 रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास घडली होती याप्रकरणी मध्यप्रदेशातील दोघांना तर बोदवड तालुक्यातील एकाला अटक करण्यात आली. गोविंदा धनराज चाफेरकार (बोदवड) व गणेश उर्फ ज्ञानेश्वर नागीण तायडे (बर्हाणपूर, मध्यप्रदेश) तसेच गौरव उर्फ विक्की सुधीर पाटील उर्फ राजपूत (19, शाहूनगर, नाडगाव, ता.बोदवड) अशी अटकेतील आरोपीचे नाव आहे.
चाकू लावून केली लूट
पाचोरा येथील ई कॉम एक्स्प्रेसच्या डिलिव्हरी बॉय दीपक प्रमोद जोशी (वय 38) हा पाचोरा मार्गाने गावांना ई कॉम एक्स्प्रेसचे डिलिव्हरी पार्सल घेऊन सोयगाव तालुक्यात प्रवेश करून बनोटीसह अनेक गावांत डिलिव्हरीचे काम पूर्ण करून रात्री आठ वाजेच्या सुमारास वडगाव ( तगजी) गावावरून शिंदोलकडे जात असताना एक किलोमीटर अंतरावर अंधाराचा फायदा घेऊन रात्री आठ वाजता दोन मोटारसायकलवरून पाच दरोडेखोरांनी या डिलिव्हरीचा बॉय चा रस्ता अडवून त्याच्या पोटाला चाकू लावत दुसर्याने लोखंडी रॉड डोक्यात टाकून त्यास गंभीर जखमी केले व त्याच्या खिशातून 17 हजार 710 रुपयांची रक्कम, सोन्याची अंगठी असा 83 हजार 710 रुपयांचा मुद्देमाल लांबवण्यात आला होता.


दोघांना अटक
पोलिस निरीक्षक अनमोल केदार यांनी रविवारी रात्री तपास चक्रे गतिमान करत आरोपींचा माग घेत सोमवारी दुपारी नगरदेवळा, ता.पाचोरा येथून गोविंदा धनराज चाफेरकार (बोदवड), गणेश उर्फ ज्ञानेश्वर नागीन तायडे (बर्हाणपूर, मध्यप्रदेश) यांच्या मुसक्या आवळल्या. न्यायालयाने त्यांना दोन दिवस पोलीस कोठडी सुनावली. दरोडेखोरांकडून 90 हजारांचा मुद्देमाल व एक हजारांचे हत्यार जप्त करण्यात आले.
तिसरा आरोपीही जाळ्यात
मंगळवारी रात्री पुन्हा एका आरोपीला सोयगाव पोलिसांनी गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषण करून भुसावळ येथून अटक केली. गौरव उर्फ विक्की सुधीर पाटील उर्फ राजपूत (19, रा.शाहूनगर, नाडगाव, ता.बोदवड) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. संशयिताला बुधवारी न्यायालयासमोर हजर केले असता त्यास गुरुवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.