दिवाळी सणाला परप्रांतीय चालकाने उचलले टोकाचे पाऊल
Extreme step taken by foreign driver on Diwali festival जळगाव : सर्वत्र दिवाळी सणाचा उत्साह सुरू असताना परप्रांतीय वाहनावर चालक असलेल्या 26 वर्षीय तरुणाने हनुमान नगरात राहत्या घरात गळफास घेतला. हा प्रकार रविवार, 12 नोव्हेंबर रोजी रात्री 11 वाजेच्या सुमारास उघडकीस आला. आत्महत्येचे कारण कळू शकले नाही. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. विशाल कुंजबिहारी पांडे (26, बर्हाणपूर, मध्यप्रदेश, ह.मु. हनुमान नगर, जळगाव) असे मयताचे नाव आहे.
सणाला उचलले टोकाचे पाऊल
मध्यप्रदेशातील बर्हाणपूर शहरातील विशाल पांडे हा गेल्या दीड वर्षांपासून हनुमान नगरात भाड्याच्या खोलीत वास्तव्यास होता. एक कंपनीत खासगी वाहन चालक म्हणून नोकरीला होता. एकीकडे दिवाळीचा सण साजरा होत असतांना दुसरीकडे विशाल पांडे याने रविवार, 12 नोव्हेंबर रोजी रात्री 11 वाजेच्या सुमारास राहत्या खोलीत गळफास घेत आत्महत्या केली. शेजारी राहणारा त्याचा नातेवाईक चेतनच्या लक्षात हा प्रकार आल्यानंतर त्यांनी नागरीकांना माहिती देत पोलिसांना माहिती कळवली. एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून मृतदेह खाली उतरवून पंचनामा केला व जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रवाना केला. नातेवाईकांनी सोमवार, 13 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात धाव घेतली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास कॉन्स्टेबल विकास सातदिवे आणि कॉन्स्टेबल राकेश बच्छाव करीत आहे. मयताच्या पश्चात आई, वडील आणि मोठा भाऊ असा परिवार आहे.

