भीषण अपघातात जामनेर तालुक्यातील मुख्याध्यापकासह तिघे ठार
जामनेर-बोदवड दरम्यान भीषण अपघात : मृतांमध्ये बोदवडच्या दोघांचा समावेश
Three people including the principal of Jamner taluka were killed in a terrible accident जामनेर : समोरून आलेल्या वाहनाने कट मारल्यानंतर झालेल्या विचित्र अपघातात जामनेर तालुक्यातील वाडीकिल्ला शाळेच्या मुख्याध्यापकासह बोदवडमधील दोघे ठार त अन्य तिघे जखमी झाल्याची घटना जामनेर-बोदवड रस्त्यावरील मालदाभाडी गावाजवळ शुक्रवारी रात्री आठ वाजता घडली.
यांचा ओढवला मृत्यू
या अपघातात वाडीकिल्ला शाळेचे मुख्याध्यापक ईश्वर त्र्यंबक पारधी (42, मालदाभाडी, ता.जामनेर) व सुनील शांताराम भोई (45, जामनेर रोड, बोदवड) व दत्तू रामा माळी (30, माळीवाडा, बोदवड) यांचा समावेश आहे.


कट मारल्याने अपघात
जामनेर ते बोदवडच्या दरम्यान असलेल्या वाडीकिल्ला गावाजवळ बोदवडहून जामनेरकडे जाणार्या दत्तू रामा माळी आणि सुनील भोई यांच्या दुचाकीला समोरून येणार्या अज्ञात वाहनाने कट मारला तर याचवेळी पाठीमागून ईश्वर पारधी हेदेखील येत असल्याने दोन्ही दुचाकी एकमेकांवर आदळून बाजूला फेकल्या गेल्या. त्यातच भरधाव वेगात असलेल्या मागून आलेल्या कारने या दोन्ही दुचाकींना धडक दिल्यानंतर भीषण अपघातामध्ये दत्तू रामा माळी, सुनील भोई आणि ईश्वर त्र्यंकर पारधी यांचा मृत्यू झाला तर कारमधील तीन महिला गंभीर जखमी झाल्या.
ग्रामस्थांची अपघातस्थळी धाव
जखमी महिलांना रूग्णालयात दाखल करण्यात आले. दोन दुचाकी आणि कारला एका अज्ञात वाहनाने कट मारल्याने दोन्ही दुचाकी एकमेकांवर आदळल्या आणि यावरच मागून आलेली कार आदळली. ही कार नंतर बाजूला जाऊन पडली तर अजून एक पीकअप व्हॅन मागून येत होती. या वाहनाच्या चालकाने अपघात पाहिल्यानंतर अचानक ब्रेक दाबले. मात्र यामुळे ही व्हॅन देखील बाजूला जाऊन पडल्याने यातील प्रवाशांना किरकोळ जखमा झाल्या. अपघाताची माहिती मिळताच परीसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमी झालेल्यांना रुग्णालयात दाखल केले. या अपघातामुळे वाहतुकीची कोंडी झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली.
