मधमाशांच्या हल्ल्यात नांदेडच्या गुराख्याचा दुर्दैवी मृत्यू
Unfortunate death of Nanded cowherd in bee attack धरणगाव : मधमाश्यांनी केलेल्या हल्ल्यात गुरे चारण्यासाठी तापी काठच्या शेत शिवाराकडे गेलेल्या गुराख्याचा मृत्यू झाला. ही घटना धरणगाव तालुक्यातील नांदेड गावात गुरुवारी घडली. सुकदेव धनसिंग कोळी (48, नांदेड, ता.धरणगाव) असे मृताचे नाव आहे.
अचानक केला मधमाश्यांनी हल्ला
तापी नदीकाठालगतच्या शेत-शिवाराकडे सुकदेव कोळी हा गुरुवारी गुरे चारण्यासाठी गेला असता दुपारी गुरे चरत असताना अचानक आगेमोहळाच्या मधमाश्यांनी त्याच्यावर हल्ला केला. मधमाश्यांनी त्याच्या संपूर्ण चेहर्यासह हातापायांवर कडाडून चावा घेतला. त्यात तो गंभीर जखमी झाला. जखमी अवस्थेत तो तेथेच पडून होता.


सायंकाळी तो घरी न परतल्याने त्याचे नातलग व घराजवळील काही लोक शोध घेण्यासाठी गेले असता तो अत्यवस्थ स्थितीत तेथेच पडून असल्याने दिसून आले. घरी आणून त्याच्यावर खाजगी डॉक्टरांद्वारे प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी चोपडा उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले परंतु उपचार सुरू असताना त्याचा रात्री मृत्यू झाला. याबाबत धरणगाव पोलिस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास हवालदार प्रदीप पवार करीत आहेत.
