अज्ञात वाहनाच्या धडकेत फरकांडेतील प्रौढाचा मृत्यू : पत्नी गंभीर
Adult in Farkand dies in collision with unknown vehicle: Wife serious धरणगाव : डोंगरकठोरा, ता.यावल येथून काम आटोपून फरकांडे, ता.एरंडोलकडे निघालेल्या दाम्पत्याच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने पतीचा मृत्यू झाला तर पत्नी गंभीर जखमी झाली. हा अपघात धरणगाव तालुक्यातील वराड फाट्याजवळील राष्ट्रीय महामार्गावर 20 नोव्हेंबर रोजी रात्री 10 वाजता घडला. या प्रकरणी अज्ञात वाहन चालकाविरोधात धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
महिनाभरानंतर दाखल झाला गुन्हा
एरंडोल तालुक्यातील फरकांडे येथील सुभाष अरूण कापूरे (51) हे आपल्या पत्नी वैशाली सुभाष कापूरे यांच्यासह 20 नोव्हेंबर रोजी दुचाकी क्रमांक (एम.एच.19 डी.के.7758) ने यावल तालुक्यातील डोंगरकठोरा येथे गेले होते. काम आटोपून दाम्पत्य हे डोंगरकठोरा येथून फरकांडे येथे जाण्यासाठी निघाले. रात्री 10 वाजेच्या सुमारास धरणगाव तालुक्यातील वराड फाट्याजवळील राष्ट्रीय महामार्गावरून दुचाकीने जात असतांना पाठीमागून अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीस्वार सुभाष कापूरे यांचा जागीच मृत्यू झाला तर त्यांची पत्नी वैशाली कापूरे या गंभीररित्या जखमी झाली. त्यांना तातडीने जळगाव येथील खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार घेतल्यानंतर वैशाली कापूरे यांनी धरणगाव पोलिसात फिर्याद दिल्यावरून अज्ञात वाहनावरील चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार विजय चौधरी हे करीत आहेत.


