जळगावातील द्रोपदी नगरात धाडसी घरफोडी : सव्वातीन लाखांचा ऐवज चोरीला


Daring house burglary in Draupadi Nagar in Jalgaon : Rs. 3.5 lakh was stolen जळगाव  : शहरात चोर्‍या-घरफोड्यांचे सत्र कायम असून घर बंद असल्याची संधी चोरट्यांनी साधत तब्बल तीन लाख 24 हजार रूपयांचा ऐवज लांबवला. हा प्रकार शहरातील द्रोपदीनगरात घडला. याप्रकरणी बुधवारी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला.

बंद घरे चोरट्यांच्या पथ्थ्यावर
द्रोपदी नगरातील रहिवासी गणेश विलास निकम हे खाजगी कंपनीत कामाला असून कंपनीच्या कामानिमित्त ते 2 डिसेंबर रोजी अकोला येथे गेले होते. त्यानंतर 3 डिसेंबर रोजी त्यांच्या पत्नी मुलाला घेवून धुळे येथे माहेरी गेल्या होत्या. त्यामुळे घरात कुणीही नव्हते. हीच संधी साधून चोरट्यांनी निकम यांचे बंद घरफोडून सव्वा तीन लाखाचा ऐवज चोरून नेला.



अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा
मंगळवार, 12 डिसेंबर रोजी शेजारी अजय पाटील यांनी चोरीविषयी निकम यांना माहिती दिली. निकम यांनी त्यांच्या भावाशी संपर्क साधून घरी जाण्यास सांगितले. बुधवार, 13 डिसेंबर रोजी निकम हे घरी आल्यानंतर त्यांना घराच्या दरवाजाचा कडी-कोयंडा तुटलेला दिसले. कपाट फोडून साहित्य अस्ताव्यस्त फेकलेले होते. टीव्ही, सेटटॉप बॉक्सदेखील चोरट्यांनी लांबविला. कपाटातील दागिने, पैसे चोरीला गेले असून निकम यांनी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अज्ञात चोरट्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक डॉ.विशाल जयस्वाल करीत आहेत.

हा ऐवज लांबवला
चोरट्यांनी पाच हजार रुपये किंमतीचा टीव्ही, एक हजार रूपये किंमतीचा सेटटॉप बॉक्स, प्रत्येकी 30 हजार रुपये किंमतीच्या तीन सोन्याच्या चैन, प्रत्येकी 30 हजार रूपये किंमतीच्या सोन्याच्या दोन अंगठ्या, 10 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे मंगळसूत्र, 75 हजार रुपये किंमतीचा सोन्याचा हार, 50 हजार रूपये किंमतीच्या 18 ग्रॅमच्या अंगठ्या, 15 हजार रूपये किंमतीचे सोन्याचे पेंडल, 18 हजार रुपयांची रोकड असा एकूण 3 लाख 24 हजार रूपयांचा ऐवज लांबवला.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !