चाळीसगावात एटीएम मशीनमध्ये रोकड भरताना 64 लाखांचा अपहार
चुकांवर पांघरून घालणार्या ऑडीटरसह त्रिकुटाला शहर पोलिसांकडून अटक
64 lakhs embezzled while paying cash in ATM machine in Chalisgaon चाळीसगाव : एटीएम मशीनमध्ये रोकड भरताना त्यात दरवेळी थोडी-थोडी रक्कम बाजूला करीत तब्बल 64 लाख 82 हजार 200 रुपयांचा अपहार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी ऑडीट रीपोर्टमध्येही चुकांवर पांघरुण घालण्यात आल्याने ऑडीटरसह बँकेच्या कर्मचार्यांविरोधात चाळीसगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून तिघांना अटक करण्यात आली आहे.
असे आहे फसवणूक प्रकरण
गोरक्षनाथ पोपट डोंगरे (38, शिवशंकर सोसायटी, रुम नं. 16 पाथरवट लेन, परेन आईसक्रिमच्या मागे, पंचवटी नाशिक) यांनी चाळीसगाव शहर पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार प्रवीण देविदास गुरव, दीपक भिकन पवार (दोन्ही रा. पाटणादेवी रोड, आदित्यनगर चाळीसगाव) व ऑडीटर चंद्रशेखर एकनाथ गुरव (गुजराल पेट्रोलपंप जवळ, निवृत्तीनगर, जळगाव) यांनी संगनमताने चाळीसगाव शहरातील आयसीआयसीआय बँकेचे एक एटीएम व आयडीएफसी बँकेचे एक एटीएम असे दोन तसेच पाचोरा शहरामध्ये मनिस्पॉट एक एटीएम व आयसीआयसीआय बँकेचे एक एटीएम अशा एकूण चार एटीएम मशीनमध्ये कंपनीमार्फत बँकेने कंपनीचे नोकर असल्याने विश्वासाने रोख रक्कम टाकताना त्यात दरवेळी पूर्ण रक्कम न भरता त्यातून वेळोवेळी थोडी थोडी अशी एकूण 64 लाख 82 हजार 200 रुपये बाजूला काढून विश्वासघात केला.


ऑडीटरने लपवली चूक
ऑडीटर चंद्रशेखर गुरव यांनी ऑडीट दरम्यान अपहाराचा प्रकार कंपनीच्या निदर्शनास आणून न देता कंपनीस खोटे ऑडीट अहवाल देवून गुरव आणि पवार या दोघांची मदत करून कंपनीचा विश्वासघात केला. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलिसात भादंवि 408, 409, 468, 34 प्रमाणे तिघांविरोवरील गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस उपनिरीक्षक सुहास आव्हाड करीत आहेत.
