नशिराबाद ते दीपनगर महामार्गावर राखेच्या बल्करची बेशिस्त पार्किंग : यंत्रणेचा कारवाईला ‘खो’

बेशिस्त पार्किंगमुळे अपघात : पोलिसांसह आरटीओ प्रशासनाच्या चुप्पीने सर्वसामान्य नागरीकांमध्ये संताप


Unruly parking of ash bulker on Nashirabad to Deepnagar highway: System action ‘lost’ भुसावळ : दीपनगर औष्णिक वीजनिर्मिती केंद्रातून राखेची वाहतूक करणारे बल्कर रस्त्यावर बेशिस्तपणे उभे केले जात असल्याने महामार्गावर अपघाताचे प्रमाण वाढले आहे. भुसावळातील खडका चौफुलीवर मंगळवारी दुपारी टायर फुटलेला बल्कर रस्त्यावर उभा असताना त्यावर भरधाव स्वीप्ट वाहन आदळून झालेल्या अपघातात तिघे तरुण गंभीर जखमी झाले. दरम्यान, नशिराबाद ते दीपनगर प्रकल्पादरम्यानच्या महामार्गावर ठिकठिकाणी ट्रक तसेच राख वाहतूक करणारे बल्कर हे बेशिस्तपणे पार्क केले जात असताना पोलिस प्रशासन, महामार्ग पोलिस व आरटीओ अधिकार्‍यांनी कारवाईला ‘खो’ दिल्याने वाहनधारकांमधून संताप व्यक्त होत आहे.

नियमबाह्य बल्करवर कारवाई कधी ?
दीपनगर केंद्रातून फ्लॉय अ‍ॅशन भरल्यानंतर बल्कर येताच पुन्हा त्यात रिफिलिंग केले जाते. यामुळे 10 टन क्षमतेच्या बल्करमधून तब्बल 28 ते 30 टन राखेची वाहतूक केली जाते. दीपनगर येथून हे बल्कर नशिराबाद सिमेंट फॅक्टरीसह राज्यभरात राखेची वाहतूक करतात. क्षमतेपेक्षा जास्त राखेची वाहतूक नियमबाह्यपणे होत असताना आरटीओ प्रशासनाकडून कारवाई होत नसल्याने बल्कर चालकांचे फावले आहे. दीपनगर केंद्रातून वीज निर्मितीनंतर निघणारी दररोजची हजारो टन फ्लाय अ‍ॅश अनेक व्यवसायांसाठी बल्करद्वारे वाहून नेली जाते.



उभ्या बल्करवर आदळले वाहन
मंगळवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास खडका चौफुलीजवळील सिद्धीविनायक बोअरींगजवळ टायर फुल्याने बल्कर टँकर (एम.एच.19 सी.वाय.7085) उभा होता. संबंधित बल्कर चालकाने रस्त्यात वाहन लावताना इंडिकेटर तसेच आजूबाजूला निशाणी लावून वाहनधारकांना सूचित करणे क्रमप्राप्त होते मात्र तसे घडले नाही तर मोकाट कुत्रा अचानक रस्त्यात आल्याने जळगावकडे जाणारी भरधाव स्वीप्ट (एम.एच.04 सी.टी.8610) यावेळी बल्करवर आदळल्याने तिचा मोठा चुराडा झाला तर या वाहनातील ओवेसी शेख जावेद (25, पंधरा बंगला भुसावळ) व अन्य स्थानिक दोन युवक गंभीर जखमी झाले. स्थानिक नागरीकांनी धावपळ करीत जखमींना तत्काळ उपचारार्थ हलवले.

पथकाला कारवाईच्या सूचना करणार : श्याम लोही
उपप्रादेशिक परीवहन अधिकारी श्याम लोही म्हणाले की, काही महिन्यांपूर्वी बेशिस्तपणे वाहने लावणार्‍या वाहनधारकांविरोधात आरटीओ प्रशासनाने कारवाई केली होती. जळगाव जिल्ह्यात आमचे केवळ दोन पथक आहेत. आजच त्यांना नशिराबाद ते दीपनगरदरम्यान बेशिस्तपणे रस्त्यावर वाहन लावणार्‍यांविरोधात कारवाई करण्याबद्दल सूचना करण्यात येतील व दर पंधरा दिवसात पुन्हा आढावा घेवू, असेही त्यांनी सांगितले.

शहर वाहतूक शाखेला सूचना करणार : पोलिस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे
पभुसावळ शहर वाहतूक शाखेतर्फे यापूर्वी रस्त्यावर बेशिस्तपणे वाहने उभी करणार्‍या वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. महामार्गावर होणारे अपघातचे प्रमाण लक्षात घेत भुसावळ शहर वाहतूक शाखेला पुन्हा कारवाई करण्याच्या सूचना करण्यात येतील, असे, पोलिस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांनी सांगितले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !