हनुमंतखेड्यातील तरुणाचा पाचोरा तालुक्यात खून
तमाशा पाहण्यासाठी आला होता युवक : अज्ञाताविरोधात खुनाचा गुन्हा
Hanumantkheda youth murdered in Pachora taluka सोयगाव : सोयगाव तालुक्यातील हनुमंतखेड्यातील तरुणाचा पाचोरा तालुक्यात खून करण्यात आला. ही घटना मंगळवारी उघडकीस आली. याप्रकरणी मंगळवारी जळगाव जिल्ह्यातील पाचोरा पोलीस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. मनोज ज्ञानेश्वर निकम (30, हनुमंतखेडा) असे मयताचे नाव आहे. मनोज हा तरुण बदरखे (ता.पाचोरा) येथे पेमबुवा महाराजांच्या यात्रेनिमित्त आयोजित तमाशाचा कार्यक्रम पाहण्यासाठी आल्यानंतर हा प्रकार घडला.
तमाशा स्थळानजीक आढळला मृतदेह
मनोज ज्ञानेश्वर निकम (30) हा युवक रविवार, 24 रोजी बदरखे, ता.पाचोरा येथे तमाशा बघण्यासाठी आला मात्र सोमवारी तो घरी हनुमंतखेडा येथे परतला नाही तर याचदिवशी तमाशा स्थळापासून काही अंतरावर सकाळी आठ वाजता त्याचा मृतदेह आढळला. याप्रकरणी पाचोरा पोलिसात सोमवारी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तरुणाच्या मृत्यूची प्राथमिक माहिती मृताचे काका नंदकिशोर पाटील यांनी नगरदेवळा दुरक्षेत्राला दिली असता लागलीच नगरदेवळा उपनिरीक्षक योगेश गणगे, सहाय्यक फौजदार कैलास पाटील व मनोहर पाटील अमोल पाटील, दिनेश पाटील आदींनी तातडीने घटनास्थळी भेेट देत पंचनामा करीत मृतदेह पाचोरा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला.


अखेर खुनाचा गुन्हा
मृत तरुणाच्या शरीरावर काही ठिकाणी मार लागल्याचे आढळून आल्यामुळे मृतदेह पुढील चौकशीकामी जळगाव शासकीय रुग्णालयात हलवण्यात आला. मंगळवारी पाचोरा पोलिसांनी अनोळखीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला. मृत तरुणाच्या पश्चात आई, वडील, बहिण असा परिवार आहे. मंगळवारी सायंकाळी सहा वाजता मृत तरुणावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
