चोपड्यात तंत्र निकेतनच्या अकाउंटने हडपली विद्यार्थ्यांची 50 लाखांची फी
50 lakhs of students’ fees were usurped by Tantra Niket’s account in Chopda चोपडा : चोपडा शहरातील शरदचंद्रिका सुरेश पाटील तंत्रनिकेतन महाविद्यालयात काम करणार्या असि.अकाउंटंटने विद्यार्थ्यांची तब्बल 50 लाख 67 हजार 893 रुपयांची फी हडपल्याचा प्रकार समोर आला आहे. सन 2014 ते 2022 दरम्यान घडलेल्या प्रकाराविषयी चोपडा शहर पोलिस स्टेशनला फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. असिस्टंट अकाऊंटंट समाधान दत्तात्रय पाटील असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.
चोपडा पोलिसात गुन्हा
चोपडा येथील विजय नारायण बोरसे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, समाधान पाटील याने 2014 ते 2022 या कालावधीत संस्थेत विद्यार्थ्यांची संपूर्ण माहिती असलेला डाटा, त्यांच्याकडून घेतलेल्या फी बाबतची माहिती ठेवण्यासाठी वापरण्यात येणार्या सॉफ्टवेअरमध्ये स्वत:च्या नावाचा युझर आयडी पासवर्डसह इतरांच्या युझर आयडी पासवर्ड वापरुन 343 विद्यार्थ्यांकडून फी म्हणून पैसे घेऊन त्यांना स्वाक्षरी करून पैसे घेतल्याची पावती दिली व त्याची कॅश बुकमध्ये नोंद न करता एकूण 50 लाख 67 हजार 893 रुपयांचा अपहार केला. तपास सहाय्यक निरीक्षक संतोष चव्हाण करीत आहेत.


