शेंदुर्णी एज्युकेशन सोसायटीच्या उपसचिवासह संचालक व सभासदाविरुद्ध गुन्हा दाखल
संचालक उमेदसिंग पाटील यांची कसून चौकशी : निवडणुकीपूर्वीच्या घडामोडीने संजय गरूडांना धक्का
A case has been registered against Shendurni Education Society’s deputy secretary and director and members शेंदुर्णी : काशीद परीवाराचे सभासदत्व रद्द करण्यासाठी कालबाह्य लेटरपॅडवर ठराव करीत तो जळगाव जिल्हा उपनिबंधकांकडे सादर करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर दि शेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन को-ऑप. संस्थेचे उपसचिव दीपक काशीनाथराव गरूड व अशोक केशव मराठे (शेंदुर्णी, ता.जामनेर) व उत्तमसिंग उमेदसिंग पाटील (मेणगाव, ता.जामनेर) यांच्याविरोधात पहूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे. दरम्यान, शैक्षणिक संस्थेची 80 वर्षात प्रथमच निवडणूक होत असून 31 डिसेंबर रोजी मतदान असून तत्पूर्वीच गुन्हा दाखल झाल्याने अध्यक्ष संजय गरूड यांच्यासह पॅनलला ही बाब धक्कादायक मानली जात आहे.
असे आहे फसवणूक प्रकरण
पहूर पोलिसात दि शेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन को-ऑप. शैक्षणिक संस्थेचे सचिव सतीशचंद्र काशीद यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, संस्थेचे उपसचिव दीपक काशीनाथराव गरूड यांनी पदाचा गैरवापर करीत कालबाह्य लेटर पॅडवर संस्थेचे सचिव सतीशचंद्र काशीद यांचे व परिवाराचे संस्थेतील सभासदत्व रद्द करण्यासाठी 24 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 10 वाजेच्या सुमारास ठराव मंजूर केला व या ठरावाला अशोक मराठे व उत्तमसिंग पाटील यांनी सूचक व अनुमोदक म्हणून मान्यता देत हा ठराव जळगाव उपजिल्हा उपनिबंधकांकडे सादर केला. संशयितांनी कट रचून सभासदांची तसेच संस्थेची फसवणूक केल्याने त्यांच्याविरोधात गुरनं.508/2023, भादंवि 467, 468, 469, 471, 472, 474, 409, 120 ब, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस उपनिरीक्षक दिलीप पाटील करीत आहेत.


एका संचालकाची कसून चौकशी
गुन्हा दाखल होताच संस्थेचे संचालक उत्तमसिंग उमेदसिंग पाटील यांना पोलिस निरीक्षक सचिन सानप यांनी बुधवारी दुपारनंतर त्याब्यात घेत त्यांची कसून चौकशी केली व सूचना देवून सोडले.
