जळगावात प्लॉट खाली करण्याच्या वादातून तरुणावर चाकू हल्ला : पाच जणांविरोधात गुन्हा
Knife attack on young man over dispute over demolition of plot in Jalgaon : Crime against five persons जळगाव : प्लाॉट खाली करण्याच्या कारणावरून काशीनाथ चौकाजवळ तरुणावर चाकूहल्ला करण्यात आला. हा धक्कादायक प्रकार मंगळवार, 26 डिसेंबर रोजी दुपारी दोन वाजता घडला. याप्रकरणी गुरुवार, 28 डिसेंबर रोजी सायंकाळी सात वाजता एमआयडीसी पोलिसात पाच जणांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला.
प्लॉटचा वाद उफाळला
एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील काशिनाथ चौकाजवळ असलेल्या मोकळ्या प्लॉटवर बांबू विक्री करण्यासाठी जागा विनोद राजाराम बाविस्कर (39, रा.बांभोरी, ता.जि.जळगाव) या तरुणाला दिली होती. दरम्यान, प्लॉट धारक शंभू भोसले याने प्लॉट खाली कर असे विनोद बाविस्कर याला सांगितले होते. त्यावर विनोद बाविस्कर यांनी प्लॉट खाली करण्यास नकार दिल्याने या रागातून संशयित आरोपी शंभू भोसले, विशाल वाघ, महेश चिंचोलकर, विजय अहिरे उर्फ भोपाली आणि कार्तिक भोसले उर्फ सोनू (सर्व राहणार जळगाव) या 5 जणांनी मंगळवार 26 डिसेंबर रोजी दुपारी 2 वाजता विनोद बाविस्कर याला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. यातील विशाल वाघ यांनी त्याच्या कमरेतील चाकू काढून विनोद बाविस्कर या तरुणावर वार केला. परंतु तो वार त्याचा मित्र सचिन पाटील याने हातावर घेतला. त्यामुळे तो जखमी झाला. ही घटना घडल्यानंतर मारेकरी पसार झाले.


संशयितांचा कसून शोध
जखमीला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर गुरुवार, 28 डिसेंबर रोजी सायंकाळी सात वाजता विनोद बाविस्कर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिसात संशयित आरोपी शंभू भोसले, विशाल वाघ, महेश चिंचोलकर, विजय अहिरे आणि कार्तिक भोसले उर्फ सोनू अशा पाच जणांविरोधात एमआयडीसी पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला. तपास पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक निलेश गोसावी करीत आहे.
