जळगाव जिल्ह्यातील चौघे गुन्हेगार स्थानबद्ध
जिल्हाधिकार्यांचे आदेश : जामनेर, पहूर, रावेरसह भुसावळातील संशयिताचा समावेश
Four criminals located in Jalgaon district भुसावळ : सामाजिक शांततेला अडसर ठरू पाहणार्या जिल्ह्यातील जामनेरसह पहूर, रावेर व भुसावळातील उपद्रवींना एक वर्षांसाठी स्थानबद्ध करण्याचे आदेश जळगाव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी काढल्याने गुन्हेगारी वर्तुळात खळबळ उडाली आहे. याबाबतची जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे वरीष्ठ निरीक्षक किसन नजन पाटील यांनी शुक्रवारी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
जामनेरातल योगेश राजपूत स्थानबद्ध
जामनेर पोलिस ठाणे हद्दीतील सात गुन्हे दाखल असलल्या योगेश भरत राजपूत (29, जामनेर) हा बेकायदेशीररित्या गावठी हातभट्टीची दारू विक्री करत होता. त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करूनही उपयोग न झाल्याने जामनेर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक किरण शिंदे यांनी स्थानबद्धतेचा प्रस्ताव सादर केला होता. त्यास मंजुरी मिळताच त्यास ठाणे कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले.


पहूरचा सुपडू तडवी अमरावतीत स्थानबद्ध
पहूर पोलिस ठाणे हद्दीतील सुपडू बंडू तडवी (42, रा.चिलगाव, ता.जामनेर) याच्याविरोधात तब्बल 16 गुन्हे दाखल असून तीन वेळा प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. गैरमार्गाने हातभट्टीची दारू विक्रीचा त्याच्यावर आरोप आहे. पहूरचे पोलिस निरीक्षक सचिन सानप यांनी स्थानबद्धतेचा प्रस्ताव तयार करून जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे पाठवला होता. मंजुरी मिळताच संशयिताची अमरावती कारागृहात रवानगी करण्यात आली.
रावेरचा शेख शाहरूख स्थानबद्ध
रावेर पोलिस ठाणे हद्दीतील शेख शाहरुख शेख हसन (26, इमामवाडा, रावेर) याच्यावर सहा गंभीर गुन्हे दाखल आहेत शिवाय दोन अदखपात्र तर पाच वेळा प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे मात्र त्यानंतरही त्यात सुधारणा होत नसल्याने रावेरचे सहाय्यक निरीक्षक आशिषकुमार अडसुळ यांनी संशयिताला स्थानबद्ध करण्याचा प्रस्ताव पाठवल्यानंतर त्यास मंजुरी मिळत्यास त्यास कोल्हापूर मध्यवर्ती कारागृहात हलवण्यात आले.
भुसावळातील योगेश तायडे नागपूरात स्थानबद्ध
भुसावळातील योगेश देविदास तायडे (33) याच्यावर गुन्हेगारी पार्श्वभूमीमुळे स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आल्याने शहरातील गुन्हेगारी वर्तुळात खळबळ उडाली आहे. याबाबतचे आदेश बुधवारी जिल्हाधिकार्यांनी पारीत करताच गुरुवारी संशयिताला ताब्यात घेत नागपूर कारागृहात हलवण्यात आले. दरम्यान, आगामी काळात आणखी काहींवर हद्दपारी तसेच मोक्कान्वये कारवाई होणार असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.
योगेश तायडेविरोधात गंभीर गुन्हे
योगेश तायडेविरोधात गावठी कट्टाचा वापर करून खुनाचा प्रयत्न करणे, खुनाचा प्रयत्न, दुखापतीसह जबरी चोरी, मारामारी, रेती चोरी करून शासकीय कामात अडथळा आणणे आदी प्रकारचे पाच गंभीर गुन्हे तसेच एक वेळा प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. गुन्हे केल्यानंतर संशयितावर पोलिसांनी कारवाई केल्यानंतर जामीनावर सुटताच संशयित पुन्हा गुन्हे करीत असल्याने नागरीकांच्या मनात भीती निर्माण झाली होती. बाजारपेठ पोलिस निरीक्षक बबन आव्हाड यांनी संशयिताची चौकशी करीत स्थानबद्धतेचा प्रस्ताव जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे पाठवला होता. या प्रस्तावाची चौकशी पूर्ण झाल्यानंतर जिल्हाधिकार्यांकडे तो कारवाईसाठी पाठवल्यानंतर बुधवारी स्थानबद्धतेचे आदेश पारीत करण्यात आले.
योगेश तायडेची नागपूरात रवानगी
जिल्हाधिकार्यांनी योगेश देविदास तायडे विरोधात आदेश पारीत केल्यानंतर पोलिस अधीक्षक एम.राजकुमार जळगाव, अपर पोलिस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलिस अधिकारी कृष्णात पिंगळे, जळगाव गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किसनरावज नजन-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बाजारपेठ पोलिस निरीक्षक बबन आव्हाड, सहाय्यक निरीक्षक हरीष भोये, पोलिस उपनिरीक्षक मंगेश जाधव, आत्माराम भालेराव, निलेश चौधरी, रमन सुरळकर, यासीन पिजांरी, महेश चौधरी, प्रशांत परदेशी, योगेश माळी, अमर आढाळे, राहुल वानखेडे, योगेश महाजन तसेच गुन्हे शाखेचे सुनील दामोदरे, ईश्वर पाटील आदींनी संशयिताची नागपूर कारागृहात गुरुवारी रात्री रवानगी केली.
