सावखेडासीम ग्रामपंचायत अपहार : खंडपीठाकडून जि.प.सीईओंना नोटीस


यावल : यावल तालुक्यातील सावखेडासीम ग्रामपंचायत अपहाराबाबत उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात पिटीशन दाखल करण्यात आली होती. या पिटीशनच्या पुढील कार्यवाहीकरीता खंडपीठाकडून जळगाव जिल्हा परीषदेचे मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांसह पोलिस प्रशासनास नोटीस बजावण्यात आली आहे. संबंधीत अपहाराच्या चौकशीकरीता पंचायत समिती समोर उपोषण देखील करण्यात आले होते.

स्वतःच्या फायद्यासाठी निधीचा उपयोग
सावखेडासीम, ता.यावल ग्रामपंचायतीमध्ये 2020 ते 2023 या कालावधीत तत्कालीन सरपंच व ग्रामसेवक यांनी अपहार केल्याची तक्रार होती. 15 वा वित्त आयोग निधी, ग्रामनिधी व गावातील जनतेने ग्रामपंचायत कार्यालयात जमा केलेला पाणीपुरवठा निधी संबंधीतांनी स्वतःच्या फायद्यासाठी वापरत अपहाराचा केल्याचा आरोप होता. पंचायत समितीचे माजी गटनेता शेखर सोपान पाटील यांनी पंचायत समितीसमोर 14 ते 22 ऑगस्ट 2023 दरम्यान उपोषणही केले होते व नंतर यावल पोलिस स्टेशनला तक्रार केली होती मात्र गुन्हा दाखल न झाल्याने शेखर पाटील यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेत पीटीशन दाखल केले. मंगळवार, 16 जानेवारी 2024 रोजी पीटीशनबाबत सुनावणी घेऊन औरंगाबाद खंडपीठाचे न्या.मंगेश एस.पाटील व न्या.शैलेश पी.ब्रम्हे यांनी प्रतिवादी सरकार पक्ष, पोलिस अधीक्षक जळगाव व मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.पं.) जळगाव यांना नोटीस जारी केली आहे. न्यायालयात तक्रारदार शेखर पाटील यांची बाजु अ‍ॅड.सुधीर तेलगोटे यांनी मांडली. त्यांना विधीज्ञ अनिल सपकाळे यांनी सहकार्य केले.

उपोषण करून न्याय न मिळाल्यानेे खंडपीठात धाव
उपोषणाला बसून सुद्धा प्रशासनाला जाग आली नाही त्यामुळे मला उच्च न्यायालयात दाद मागावी लागली. लोकांच्या पैशाचा अपहार झाला आहे. याची चौकशी होवून संबंधीतांकडून रक्कम वसूल करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल होतील, असा विश्वास आहे, असे तक्रारदार शेखर पाटील यांनी सांगितले.


कॉपी करू नका.